बीड : बीड जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या बॅटरी चोरांच्या टोळीला गजाआड करण्यात दरोडा प्रतिबंधक पथकाला यश आले आहे. ५ पैकी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून ५१ बॅटऱ्यांसह चार बंडल रिवायडिंग वायर असा ५ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मोमीन इरशाद मोमीन बाशीद (२७, तेलगाव नाका, बीड), शेख अतीक शेख रशीद (१९, बालेपीर), अमोल अरुण गायकवाड (२०, राजीवनगर, बीड) असे पकडलेल्या तिघांची नावे असून, अन्य दोघे फरार आहेत.
चोरी केलेल्या बॅटऱ्या व वायर हे एका पिकअपमधून अहमदनगर जिल्ह्यात विक्रीसाठी जात असल्याची माहिती एडीएसचे सपोनि गजानन जाधव यांना मिळाली. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह च-हाटा फाटा येथे सापळा लावला. चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु खाक्या दाखवताच त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. नेकनूर, पाटोदा, गेवराई, केज, युसूफवडगाव अशा पाच ठाण्यांमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. या सर्वांना नेकनूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, उप अधीक्षक सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गजानन जाधव, संजय खताळ, मुंजाबा सौंदरमल, श्रीमंत उबाळे, राजाभाऊ नागरगोजे, अशोक दुबाले, गणेश दुधाळ, अंकुश दुधाळ, हरीभाऊ बांगर, माया साबळे, नारायण साबळे, राहुल शिंदे, पी. टी. चव्हाण यांनी केली.