नवी मुंबई : नोकरी निमित्ताने अमेरिकेला चाललेल्या व्यक्तीची पासपोर्ट ठेवलेली बॅग चोरटयांनी पळवल्याची घटना सोमवारी रात्री वाशीत घडली. विमानाच्या तीन तास अगोदर हा प्रकार घडल्याने त्यांचा प्रवास रद्द होण्याची वेळ आली होती. मात्र वाशी पोलीसांनी कौशल्य पणाला लावून चोरट्यांचा मागोवा घेत त्यांनी महापे परिसरात फेकलेल्या बॅगचा शोध घेऊन त्यांचे पासपोर्ट मिळवून दिले.
वाशी येथे राहणाऱ्या कुटुंबासोबत सोमवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या कुटुंबातील काही व्यक्ती नोकरी निमित्ताने अमेरिकेला चालल्या होत्या. मंगळवारी पहाटे २ वाजता त्यांच्या विमानाचे उड्डाण असल्याने रात्री ९ वाजता ते वाशी सेक्टर १२ येथील हॉटेल मध्ये जेवायला बसले होते. सुमारे अर्धा तासाने ते रस्त्यालगत उभ्या केलेल्या कार जवळ आले असता, कारची मागच्या बाजूची काच फुटल्याचे आढळून आले. शिवाय कार मध्ये ठेवलेली लॅपटॉची बॅग देखील आढळून आली नाही. या बॅग मध्ये त्यांचे पासपोर्ट व व्हिजा शिवाय प्रवासासाठी लागणारी इतर आवश्यक कागदपत्रे होती. त्यामुळे या कुटुंबावर अमेरिका वारी रद्द होण्याची वेळ आली होती. या घटनेबाबत त्यांनी वाशी पोलीसांना कळवले असता वरिष्ठ निरीक्षक रमेश चव्हाण यांनी तात्काळ ४ ते ५ पथके तयार केली होती. या पथकांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातले सीसीटीव्ही तपासले. त्यामध्ये चोरटे ज्या दिशेने गेले त्या मार्गावरून पोलीस त्यांच्या मागे धावू लागले.
अखेर सुमारे एक तासाच्या पाठलागानंतर महापे येथे रस्त्यालगत त्यांना चोरटयांनी चोरलेली बॅग फेकलेल्या अवस्थेत आढळून आली. पोलीसांनी या बॅगची झडती घेतली असता त्यात सदर कुटुंबाचे पासपोर्ट व इतर सर्व कागदपत्रे आढळून आली. चोरट्याने त्यामधील लॅपटॉप घेऊन ती बॅग त्याठिकाणी टाकुकन दिली होती. तर पोलीसांनी कार्यतत्परता दाखवत चोरट्यांचा मागोवा घेतल्याने हि बॅग हाती लागली व पुढील काही मिनिटात या कुटुंबाने विमानतळाकडे धाव घेतली. हे कुटुंब वेळेत विमानतळावर पोचल्याने त्यांना नियोजित विमान देखील मिळाल्याचे वरिष्ठ निरीक्षक रमेश चव्हाण यांनी सांगितले. तर या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून लॅपटॉप चोरणाऱ्यांचा शोध सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.