पाटणा: बिहारमध्ये चोरट्यांनी लोखंडाचा ८० फूट लांबीचा पूल चोरला आहे. गॅस काटरनं पूल कापून चोरटे फरार झाले. पूल चोरीची ही महिन्याभरातील तिसरी घटना आहे. याआधी काही आठवड्यांपूर्वी नालंदा जिल्ह्यातल्या जहानाबादला बिहारशरीफला जोडणारा पूलदेखील गायब झाला होता. हा पूल दर्धा नदीवर उभारण्यात आला होता.
बांकामधील चंदन विभागाचे बीडीओ राकेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूल तोडण्यासाठी चोरट्यांनी गॅस कटरचा वापर केला. लोखंड आणि स्टिलपासून तयार करण्यात आलेल्या पुलाचा ७० टक्के भाग गायब झाला आहे. त्याआधी नालंदा आणि रोहतास जिल्ह्यांमधील पूल चोरीच्या घटना घडल्या आहेत.
बिहारच्या सुलतानगंजमधून झारखंडच्या देवघरला जाणाऱ्या भाविकांसाठी २००४ मध्ये पूल उभारण्यात आला होता. हा पूल ८० फूट लांब आणि १५ फूट रुंद होता. पूल उभारणीसाठी ४५ लाखांचा खर्च आला होता. गॅस कटरच्या मदतीनं चोरट्यांनी पुलाचा जवळपास ७० टक्के भाग कापला.
काही आठवड्यांपूर्वीच नालंदा जिल्ह्यातल्या जहानाबादला बिहारशरीफला जोडणारा दर्धा नदीवरील पूल चोरीला गेल्याची घटना घडली. त्याआधी एप्रिलमध्ये चोरांच्या एका टोळीनं रोहतास जिल्ह्यातील ६० फूट लांबीचा पूल दिवसाउजेडी चोरून नेला. विशेष म्हणजे ही चोरी स्थानिक अधिकारी आणि ग्रामस्थांच्या मदतीनं झाली. चोरटे सिंचन अधिकारी बनून रोहतासमध्ये आले आणि त्यांनी गॅस कटरच्या मदतीनं पूल चोरला.