उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे भुयार खणून चोरांनी दागिन्यांच्या दुकानात घुसून लाखोंचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना समोर आली आहे. या टोळीने रात्री नाल्याच्या मार्गावर भुयार खणलं आणि लाखोंचे दागिने चोरले. त्यामुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू असून प्रकरण गंभीर झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण जिल्ह्यातील नौचंदी पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या नंदन सिनेमाजवळील अंबिका ज्वेलर्सशी संबंधित आहे. येथे अंबिका ज्वेलर्सचे मालक पीयूष गर्ग यांना त्यांच्या दुकानात चोरी झाल्याचे समजताच त्यांना मोठा धक्काच बसला. पीयूष यांच्या दुकानातून सर्व दागिने चोरीला गेले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी तपास केला असता चोरट्यांनी तिजोरी कापण्यासाठी गॅस कटर आणल्याचे निष्पन्न झाले, मात्र त्यांना त्यात यश आले नाही. चोरट्यांनी भुयार खणून दुकानात प्रवेश केला आणि सोबत असलेले सीसीटीव्ही काढून टाकले. एवढेच नाही तर चोरट्यांनी दुकानाचा हिशोब ठेवत असलेल्या डायरीत एक मेसेज लिहिला आहे. जो वाचून तुम्हालाही धक्का बसेल.
चोरट्यांनी हिशोब डायरीत लिहिलं, "माफ करा भाऊ, चोरी करणं आमचा नाईलाज आहे. मला माफ कर पण तुमची जमीन खूप मजबूत आहे." या घटनेमुळे संतप्त सराफा व्यापाऱ्यांनी ‘पोलीस गो बॅक’च्या घोषणाही दिल्या. मेरठ ज्वेलर्स ऑर्गनायझेशनचे महासचिव विजय आनंद अग्रवाल यांनी सांगितले की, मेरठमधील सराफा दुकानातून चोरीची ही चौथी घटना आहे. यापूर्वी कुंबलकर येथे दोन तर परतापुरात एकदा चोरीच्या घटना घडल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"