उल्हासनगर - एका गुन्ह्यात अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांसह महिला पोलिसाला आरोपीकडून मारहाण केल्याची घटना मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी आरोपीवर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे .
उल्हासनगरातील मध्यवर्ती पोलिसांना एका गुन्ह्यात अमित आसुदानी हा पाहिजे आरोपी होता. त्याला अटक करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक गायकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तडवी, पोलीस नाईक चौधरी, महिला पोलीस हवालदार राधा चोपडे, गाडी चालक देशमुख यांचे पथक काल दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास गेले होते. अमित आसुदानीला अटक करतेवेळी त्याने भर रस्त्यावर धिंगाणा घालत पोलिसांना शिविगाळ केली. पोलीस उपनिरीक्षक गायकर यांना धक्काबुक्की करत त्यांचे शर्ट फाडले. तसेच त्याने मारलेली लाथ महिला पोलीस शिपायांच्या हाताला लागून, काचाच्या बांगडय़ा फुटून त्या जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी अमित यांच्यावर सरकारी कामात अडथडा करणे, महिला कर्मचाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांना मारहाण करणे आदी गुन्हे दाखल करून अटक केली. शहरात एकूणच गुन्हेगारीच्या घटनेत वाढ झाली असून ऑक्टोबर महिन्यात 3 खुनाच्या घटना घडल्या आहेत. चोरी, फसवणूक, अपहरण, जुगार, बलात्कार, महिलांवर अत्याचार, गावठी दारू, चेन स्नॅचिंग,घरफोडी आदी घटनेत वाढ झाली आहे.