मीरा रोड : भाईंदरच्या उत्तन भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने, साेमवारी रात्री संतप्त ग्रामस्थांनी पातान बंदर येथे तीन तरुणांना चोर समजून बांधून मारहाण केली. गणेश भोईर (१९), हरचंद भोईर (२०) व अंकुश भासर (२१, सर्व रा.उत्तन) अशी तरुणांची नावे आहेत.
पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही मारहाण व धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी १८ ते २३ जणांवर गुन्हा दाखल करून शिवसेना नगरसेविकेचा पती अजित गंडाेली, सायमन बगाजी व सचिन नून या तिघांना अटक केली आहे. पोलीस नाईक चेतन पाटील यांनी मंगळवारी फिर्याद दिली. त्यानुसार, सोमवारी रात्री १०.४५ वाजता पोलीस ठाण्यात आलेल्या फाेनवरून भुतोडी-पातान बंदरदरम्यान चोर समजून मंडपाचे काम करणाऱ्या तिघांना जमावाकडून मारहाण सुरू असल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर, उपनिरीक्षक किरण धनवडे आपल्या दाेन सहकाऱ्यांसह घटनास्थळी गेले. दाेरीने बांधून ठेवलेल्या तिघांना मारहाण करत होते. जमावाला आवाहन करून जमाव ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. त्यामुळे धनवडे यांनी अन्य अधिकाऱ्यांना घटनास्थळी बाेलावले. त्यानंतर धनवडे यांनी शिवसेना नगरसेविका शर्मिला गंडोली यांचे पती अजित यांच्यासह सायमन बगाजी व सचिन नून यांना कायदा हातात न घेता तरुणांना ताब्यात द्या, अशी विनंती केली. त्यांनी ते ऐकले नाही.
पाेलिसांना गराडा
जमावाने विराेध करून पोलीस व वाहनाभोवती गराडा घातला. त्यांना गाडीत बसविल्यानंतर पोलिसांनी जमावावर बळाचा वापर करताच, लोकांनी पाेलिसांना पुन्हा धक्काबुक्की केली आणि तिघांना बाहेर काढून पुन्हा मारहाण केली. पोलिसांच्या गाडीवर लाथा मारल्या. जादा कुमक येताच पाेलिसांनी तिघांची जमावाच्या तावडीतून सुटका केली.