नागपूर : वीज मीटर बदलण्याच्या नावाखाली बांधकामाच्या साईटवरून इलेक्ट्रीकचे सामान चोरणाऱ्या चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाने ही कारवाई केली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही चोरी झाली होती.
अश्विन उके (४२, संत लहानुजी नगर) यांचे धमगाये नगर येथील साईटवर इमारतीचे बांधकाम सुरू होते. १३ ऑगस्ट रोजी तीन इसम तेथे आले व मजुर महिलेला मीटर बदलण्यासाठी आल्याची थाप मारून वरील मजल्यावरी इलेक्ट्रीकचे सामान लंपास केले. उके यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हे शाखेकडून याचा समांतर तपास सुरू होता. खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून पोलिसांना यात योगेश उर्फ लक्की रमेश शाहू (२५, काशीबाई देवळाजवळ, कोतवाली) व आदित्य जितेंद्र टेंभरे (३०, कर्नलबाग) यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले असता त्यांनी चौकशीदरम्यान गुन्हा केल्याची कबुली दिली. सारंग इंगळे (३१, चंदननगर) हादेखील गुन्ह्यात सहभागी असल्याची त्यांनी माहिती दिली. आरोपींची सखोल चौकशी केली असता त्यांनी बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरीहर नगर येथील साई मन्नत अपार्टमेंट येथूनदेखील ईलेक्ट्रीकच्या वायर्सचे बंडल चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांच्या कडून दुचाकी जप्त केली. पोलीस निरीक्षक मुकुंद ठाकरे, सचिन भोंडे, नवनाथ देवकाते, ईश्वर खोरडे, मुकेश राऊत, प्रविण लांडे, अनुप तायवाडे, अमोल जासुद, संतोष चौधरी, विशाल रोकडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.