मंगेश कराळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा: १ हजारांची लाच घेताना विरार पोलीस ठाण्याती महिला पोलीस हवालदार समीक्षा मोहिते यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. अदखलपात्र (एनसी) गुन्ह्यात तडजोड करण्यासाठी मोहिते यांनी ही लाच मागितली होती. मागील ४ दिवसात वसई विरार शहरातील लाचलुतपत प्रतिबंधक विभागाची ही तिसरी कारवाई आहे.
दोन भावांच्या किरकोळ वादाप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल होता. नंतर दोन्ही भावांचा वाद मिटला. परंतु पुढील कारवाई (चॅप्टर केस) न करण्यासाठी विरार पोलीस ठाण्याती महिला पोलीस हवालदार समीक्षा मोहिते (५१) यांनी दिड हजारांची लाच मागतिली होती. तडजोडीअंती १ हजार रुपयांची रक्कम ठरली. याप्रकऱणी फिर्यादीने पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार शुक्रवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास सापळा लावून मोहीते यांना १ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक कऱण्यात आली. पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.