जळगाव : दोघांचा संसार सुरळीत सुरू असताना त्या दोघांत तिसरीने एन्ट्री केली. पहिलीच्या नाकावर टिच्चून दुसरीही चार वर्षे घरात राहिली. त्यामुळे दोघांमध्ये होणाऱ्या वादातून दुसरीच्या आई, वडील व भावांनी पहिल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेबाबत शनिवारी रात्री शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका प्रेमीयुगुलाने आंतरजातीय विवाह केला. हे दाम्पत्य शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्याला आहे. दोघांना एक मुलगी झाली. अशातच पतीच्या संसारात दुसरीने एन्ट्री केली. त्यामुळे पती-पत्नी व ती यांच्यात सतत वाद होऊ लागले. पहिली खासगी नोकरी करते तर दुसरी यांच्या घरात येऊन जबरदस्तीने संसार करायला लागली. दोघंही एकाच घरात वेगवेगळे राहतात. चार वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याने सातत्याने दोघींमध्ये वाद होऊ लागले. त्यामुळे दुसरी मार्च महिन्यात आई, वडिलांकडे निघून गेली होती.
एकाने पेट्रोल टाकले, दुसऱ्याने आगपेटी काढली
२ जुलै रोजी सायंकाळी पावणे आठ वाजता दुसरीचे आई, वडील व भाऊ असे पहिल्या पत्नीच्या घरी आले. ती मुलीसोबत घरात असतानाच माझ्या मुलीला तुझ्या नवऱ्यासोबत का राहू देत नाही, असे म्हणत आज तुला मारून टाकून कायमचा तंटा मिटवून टाकतो, असे म्हणत दुसरीच्या एका भावाने बाटलीतले पेट्रोल अंगावर टाकले तर दुसऱ्या भावाने आगपेटी काढली. हा प्रकार पाहून मुलीने आरडाओरड केल्याने गल्लीतले लोक धावत आल्याने हे सर्व जण तेथून निघून गेले, असे फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान, या घटनेतील संशयित नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने पीडिता तेथे गेली, मात्र घटनास्थळ जळगाव शहरचे असल्याचे सांगून नशिराबाद पोलिसांनी तिला जळगावात पाठविले. त्यानुसार शनिवारी चौघांविरुध्द खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक जगदीश मोरे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. अद्याप या गुन्ह्यात कोणालाच अटक झाली नसल्याचे मोरे यांनी सांगितले.