मुंबई - पीएमसी बँकेत लाखो रूपये अडकून राहिल्याचा मानसिक तणावातून ह्रदयविकाराच्या झटक्यानं संजय गुलाटी (५१) आणि फत्तेमुल पंजाबी (५९) यांना जीव गमवावा लागला आहे. या घटना ताज्या असताना तणावामुळे आता पीएमसी बँकेत १ कोटींची रक्कम असलेल्या डॉ. योगिता बिजलानी यांनी राहत्या घरात आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. अंधेरीतील वर्सोवा परिसरात राहणाऱ्या डॉ. बिजलानी यांनी झोपेच्या गोळ्यांचं अतिसेवन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून डॉ. योगिता या मानसिक तणावाखाली होत्या, अशी माहिती वर्सोवा पोलिसांकडून देण्यात आली. या आत्महत्येशी बँक घोटाळ्याचा संबंध आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नसून डॉ. योगिता यांच्या पीएमसी बँकेतील खात्यामध्ये तब्बल १ कोटींपेक्षा अधिक रक्कम असल्याची माहिती समोर आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, वर्सोवा पोलिसांनी सध्या अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.डॉ.योगिता या पतीसोबत अमेरिकेत राहत होत्या. आपल्या १८ महिन्यांच्या बाळासह त्या आपल्या आई-वडिलांच्या घरी आल्या होत्या. यापूर्वीही त्यांनी अमेरिकेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. मंगळवारी बिजलानी यांनी झोपेच्या गोळ्यांचं अतिसेवन केले होते. या घटनेची माहिती मिळताच डॉक्टरांच्या वडिलांनी तात्काळ रूग्णालयात दाखल केलं. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.