मुंबई - काल रात्री थर्टी फर्स्टच्या बंदोबस्तासाठी पोलीस जसे रस्त्यांवर सुरक्षेसाठी होते. तसाच त्यांचा पहारा समुद्रात देखील होता. दरम्यान, गिरगाव चौपाटीजवळ समुद्रात गस्त घालत असलेल्या पोलिसांना घेऊन जाणारी बोट अचानक बुडाली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. या बोटीत 6 पोलीस होते. काल रात्री ८. 40 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत एक पोलीस कर्मचारी या घटनेत जखमी झाला असून त्याच्यावर मुंबई सेंट्रल येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या सहा पोलिसांकडे लाइफ जॅकेट नव्हते.
ही बोट गिरगाव चौपाटीच्या किनारपट्टीपासून 300 मीटर अंतरावर बुडत होती. या घटनेत जीवरक्षक प्रतीक वाघे याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सहा पोलिसांचे प्राण वाचले आहेत. दरवर्षी गिरगाव चौपाटीवर थर्टी फर्स्टसाठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर गिरगाव चौपाटीवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. पोलिसांचे एक पथक या बोटीत होते. या बोटीचा वापर पोलिसांना समुद्रात गस्त घालणाऱ्या नौकेपर्यंत नेण्यासाठी केला जातो. हा प्रकार लक्षात येताच जीवरक्षक प्रतीक वाघे बोटीच्या दिशेने मदतीसाठी गेला. या दरम्यान पोलिसांची दुसरी गस्ती नौका कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी तिथे पोहोचली. त्यांनी जीवरक्षक प्रतीक वाघेच्या मदतीने सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. यातील एक कर्मचारी जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांच्या मदतीसाठी आणखी एक मच्छीमार थर्माकोलच्या साहाय्याने तिथे पोहोचला होता. मात्र, यादरम्यान त्याची देखील अर्धवट आल्यावर दमछाक झाली. प्रतीक वाघेने त्या मच्छीमाराला देखील सुखरुप किनाऱ्यावर आणले.