बार्शी : शेअर मार्केटमध्ये अल्गो ट्रेडिंग व ग्रे मार्केटमधील आयपीओमध्ये गुंतवणूक करून महिना ५ ते २५ टक्के रिटर्न्स देण्याच्या नावाखाली शेकडो गुंतवणूकदार तब्बल २०० कोटींना डुबले गेल्याने बार्शीकर हादरले आहेत. विशालका कन्सल्टंट सर्व्हिसेसचा संचालक विशाल फटे रविवारी (दि. ९) पसार झाला आहे. त्याच्यावर बार्शी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर अशा पद्धतीने फसवणूक झालेले अनेक तक्रारदार आता पुढे येऊ लागले आहेत. दोन दिवसांत बार्शी पोलिसांत प्रत्यक्ष ३५ तक्रारी अर्ज आले असून, शनिवारपर्यंत फसवणूक झालेल्या रकमेचा आकडा १२ कोटींच्या वर गेला आहे.
कित्येक लोकांनी घर, जमीन गहाण ठेवून, सोने बँकेत ठेवून त्याच्याकडे गुंतवणूक केली होती. बार्शी व परिसरासोबतच त्याच्याकडे निपाणी (कर्नाटक), पुणे, आटपाडी (सांगली) भागांतीलही अनेकजणांच्या गुंतवणुकी होत्या, अशीदेखील चर्चा आहे. त्याच्या मंगळवेढा तालुक्यातील गावी वडिलोपार्जित पाच एकर शेती आहे. नुकतेच त्याने गावाकडे एक छोटेसे फार्म हाऊस बांधले होते.
एचएफटी सेंटर टाकायचे होते म्हणे
मागील काही दिवसांपूर्वी तो मला बार्शीत एचएफटी सेंटर टाकायचे आहे, असे म्हणत होता. म्हणजे अल्गो ट्रेडिंगसाठी त्याचा उपयोग होऊन शेअर बाजार सुरू असताना फास्ट ट्रेडिंग करता येईल व ग्राहकांना जास्त रिटर्न मिळवून द्यायचे असे सांगत होता.
१५ जणांचा स्टाफ होता कामाला
बार्शीत उपळाई रोडवर असलेल्या त्याच्या कार्यालयात दहा ते पंधरा मुली कामाला होत्या. मात्र प्रत्यक्षात त्या कोणते काम करीत होत्या, हेदेखील अद्याप समजलेले नाही. एक महिन्यापूर्वी त्याने या मुलींना कामावरून कमी केले होते.
पुण्यात फ्लॅट असल्याचे सांगायचा
आता मी पुण्यात वर्ल्ड ट्रेंड सेंटरमध्ये ऑफिस खरेदी केले असून ते कार्यान्वित केले असल्याचे तो सांगत होता. यासोबतच माझा पुण्यात फ्लॅट आहे असेही अनेकांना सांगायचा. मात्र हा फ्लॅटही भाड्याने घेतलेला होता असे त्याचे मित्र बोलत आहेत. त्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारांसोबतच प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांच्या मोठ्या रकमा घेतल्या असल्याची बार्शीत चर्चा आहे.
पैसे कोठून आले सांगायचे कसे?
ज्या गुंतवणूकदारांनी आपल्या बँक खात्यावरून चेक अथवा आरटीजीएसद्वारे रक्कम गुंतवणुकीसाठी दिली आहे, असे लोक आता हळूहळू तक्रार देण्यासाठी पुढे येत आहेत. मात्र ज्यांनी आपली दोन नंबरची रक्कम त्याला कॅश स्वरूपात दिली आहे, अशा लोकांची मोठी अडचण झाली आहे; कारण तक्रार द्यावी तर पैसे कुठून व कसे आले हे सांगायचे कसे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
मध्यस्थांचे धाबे दणाणले
कित्येक गुंतवणूकदार हे स्वतःचे पैसे बुडाले म्हणून गप्प बसले आहेत. मात्र अनेकांनी त्याला पैसे गोळा करून दिले आहेत. त्यामध्ये त्यांनी फटे यांच्याकडून कमिशनदेखील घेतले असल्याचे बोलले जात आहे. आता असे गुंतवणूकदार संबंधित मध्यस्थाकडे माझे पैसे दे म्हणून हेलपाटे घालू लागले आहेत. त्यामुळे अशांचेही धाबे दणाणले आहेत.
गुंतवणूकदारांवर छापा टाकायचा
विशाल फटे हा मित्राशी किंवा गुंतवणूकदार यांच्याशी बोलताना माझ्या फॉक्स ट्रेडिंग सोल्युशन या अल्गो ट्रेडिंग करणाऱ्या कंपनीत पुनित तेवानी हा पार्टनर असून त्याचे नोएडा येथे ऑफिस आहे आणि तो आता शेअर बाजार संबंधित विविध चॅनलवर एक्स्पर्ट म्हणून कार्यरत आहे असे सांगायचा. पुनित हा त्याला फेसबुकवर म्युच्युअल फ्रेंडही आहे, असे सांगून छाप पाडायचा, असे सांगितले जायचे.
वकीलपत्र घेण्यास कोणी पुढे आले नाहीत
विशाल फटेचे वडील अंबादास फटे व वैभव फटे यांना पोलिसांनी सहआरोपी केले आहे. शुक्रवारी रात्री अटक केल्यानंतर शनिवारी पोलिसांनी त्यांना न्यायालयात उभे केेले. यावेळी त्यांचे वकीलपत्र घेण्यासाठी कोणी पुढे आले नाही.