सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-१ शहाड बिर्ला फाटक येथे रस्त्यावर डीजे लावून धिंगाणा घालणाऱ्या तरुण-तरुणीला उल्हासनगरपोलिसांनी चोप दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात धिंगाणा घातल्याची नोंद करण्यात आली.
उल्हासनगर शांतीनगर परिसरात थर्टीफर्स्टच्या मध्यरात्री पोलिसांवर शेरेबाजी करणाऱ्या तरुणांना मारहाण केल्याचा प्रकार उघड झाल्यावर, पोलिसांच्या दबंगगिरी प्रकारची चर्चा सुरू आहे. तसेच शेरेबाजी करणाऱ्या तरुणावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकाराची चर्चा शहरात सुरू असताना शहाड फाटक बिर्ला गेट परिसरातील भर रस्त्यावर डीजे लावून थर्टीफर्स्टच्या रात्री धिंगाणा घालणाऱ्या तरुण तरुणांना पोलिसांना चोप दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. चोप दिल्या प्रकरणाची नोंद पोलीस डायरीत आहे. ऐन कोरोना काळात जमावबंदी असतांना असा धिंगाणा घालणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल व्हायला हवा. अशी मागणी शहरातून होत आहे. तर पोलीस अधिकारी तपास करीत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.