तामिळनाडूमध्ये एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. तिरुवर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलाने आत्महत्या केली आहे. पेरालम परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. संजय असं मृत मुलाचं नाव आहे. तो 14 वर्षांचा होता. संजय पेरालममधील खासगी शाळेत इयत्ता नववीमध्ये शिकत होता. गेल्या काही दिवसांपासून तो तणावाखाली होता. शाळेतून दिल्या जाणाऱ्या गृहपाठामुळे तो डिप्रेशनमध्ये होता असं सांगितलं जात आहे.
माझी शाळा बदला, असं संजय अनेक दिवसांपासून आई-बाबांना सांगत होता. मात्र कुटुंबीयांनी शाळा बदलण्यास नकार दिला. यामुळे नाराज झालेल्या संजयचा 22 ऑगस्टला आई-वडिलांशी वाद झाला. आई, वडील ओरडताच संजय घराच्या छतावर गेला आणि टोकाचं पाऊल उटललं. तिथे त्याने पेट्रोल टाकून स्वत:ला जाळून घेतलं. स्वत:ला पेटवून घेताच संजय वेदनेनं तो जोरजोरात ओरडू लागला.
संजयचा आवाज ऐकून आई, वडील छतावर पोहोचले. त्यांनी आग विझवली आणि 108 क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलावली. संजयला तिरुवरुर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 23 ऑगस्टला उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पेरालम पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. संजयचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.
चेन्नईमध्ये देखील याआधी इयत्ता बारावीमध्ये शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. शिवगंगा जिल्ह्यातील घरात विद्यार्थी मृतावस्थेत आढळून आला. गणित आणि जीवशास्त्र विषय कठीण वाचत असल्याने आत्महत्या करत असल्याचं त्यानं सुसाईड नोटमध्ये म्हटलं होतं. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.