भिवंडी- शहरात सोनसाखळी चोरी मोबाईल चोरी व मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी परिमंडळातील प्रत्येक पोलीस ठाणेतील अधिकारी व अंमलदार यांना आपआपले पोलीस ठाणे हददीत सतर्क गस्त व प्रतिबंध व्हावा यासाठी कारवाईचे आदेश दिले होते.
पूर्व विभग सहा.पोलीस आयुक्त किशोर खैरनार,नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाने नारपोली पोलीस ठाणे हददीत सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन पाटील व पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती घेऊन रेकॉर्डवरील गुन्हेगार असगर अली अरशद हुसैन अंसारी,वय १९ वर्षे,रा.आझादनगर व रजा मलीक सैय्यद वय १९ वर्षे, रा. जैतुनपुरा या दोघांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे तपास केला असता नारपोली पोलीस ठाण्यात दाखल चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
या दोन्ही आरोपीं कडून ५ हजार रुपयांचा मोबाईल चोरी, १लाख २० हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या चैन, जबरी चोरी करण्यासाठी वापरलेली ५० हजार किमतीची दुचाकी,५० हजार रुपयांची चोरीची दुचाकी असा एकूण २ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी बुधवारी दिली आहे.