पुणे : पश्चिम बंगाल येथील विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष माजीद अन्सारी यांचा खून करुन फरार झालेल्या तिघांना चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली़ अाहे. नबाब हिदाईतुल लेट नबीअल इस्लाम (वय २४, रा़ हिलगुटी रेलगुंठी, कोतवाली, कुचबिहार), सयाम ऊर्फ लोटस अजीजऊल हक (वय २२, रा़ न्यूपल्ली कोतवाली, कुचबिहार), संजित जोगिंदर सहानी (वय २४, रा़ न्यूपल्ली कोतवाली, कुचबिहार) अशी या तिघांची नावे आहेत़
पश्चिम बंगाल मधील कॉलेजमधील वादावादी या तिघांसह ७ जणांनी मिळून विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष माजीद अन्सारी याचा खुन केला होता. त्यानंतर हे तिघे पुण्यात पळून आले होते. पश्चिम बंगाल पोलिसांनी याप्रकरणात अगोदर तिघांना अटक केली आहे. हे तिघे पुण्यात असल्याची माहिती मिळाल्यावर पश्चिम बंगालमधील कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर कुमार पाल व त्यांचे सहकारी पुण्यात आले होते. बाणेर येथे राहत असलेल्या या तिघांना पकडण्यासाठी चतु:श्रृंगी पोलिसांकडे मदत मागितली़ तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, उपनिरीक्षक प्रेम वाघमोरे महेश बामगुडे, अजय गायकवाड, संतोष जाधव, सारस साळवी, संजय वाघ, अमर शेख, तेजस चोपडे यांनी बाणेर परिसरात शोध घेऊन बुधवारी तिघांना पकडून पश्चिम बंगाल पोलिसांच्या ताब्यात दिले़ पुण्यात आल्यानंतर हे तिघेही मिळेल ते काम करीत असत.