मुंबई - ‘ओएलएक्स’द्वारे पुस्तके विकणे एकाला चांगलेच महागात पडले आहे. भारतीय सैन्यात असल्याची बतावणी करत पुस्तके खरेदी करण्याचे सांगत एका भामट्याने ‘गुगल पे’द्वारे ७९ हजार ९८० रुपये काढून घेत त्याची फसवणूक केल्याची घटना कल्याण पश्चिमेत घडली.
पश्चिमेतील दुधनाका परिसरात राहणारे संजय प्रभू (५५) यांचा मुलगा सूरज याने दोन महिन्यांपूर्वी ‘ओएलएक्स’वर घरातील काही जुन्या वस्तू विकण्यासंदर्भात माहिती पोस्ट केली होती. त्याला प्रतिसाद देत २५ डिसेंबरच्या दुपारी १ च्या सुमारास पवनकुमार नावाच्या व्यक्तीने सूरजला फोन केला. पवनकुमारने त्याच्याकडे पुस्तकांबाबत विचारणा करत ही पुस्तके विकत घ्यायची असल्याचे सांगितले. त्यावर पुस्तके २०० रुपयांना विकणार असल्याचे त्याने पवनकुमारला सांगितल्यानंतर त्याने त्यास होकार दर्शविला.
आपण भारतीय सैन्यात कामाला असून, सध्या ठाण्यात राहात असल्याचे पवनकुमारने सूरजला सांगितले. प्रति पुस्तक २२० रुपयांना खरेदी केले जाईल. तसेच माझा मुलगा घरी येऊन ही पुस्तके घेऊन जाईल, असेही त्याने सांगितले. त्यानंतर, पवनकुमारने सूरजकडे ‘गुगल पे’चे खाते आहे का, अशी विचारणा केली. तेव्हा माझ्या वडिलांकडे ‘गुगल पे’ असल्याचे सूरजने सांगत त्यांचा नंबर पवनकुमारला दिला. थोड्या कालावधीनंतर पवनकुमारने पैसे पाठवल्याचे सांगत क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला पैसे मिळतील, असे सांगितले. त्याच्या म्हणण्यानुसार सूरजने क्युआर कोड स्कॅन केला असता पुढे जाण्याचा पर्यायावर क्लिक करण्यास पवनकुमारने सांगितले.