मुंबई - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीमधील अरूणाधरण प्रकल्पात हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. २००५ मध्ये ५४ कोटींचा खर्च अपेक्षित असलेला प्रकल्प आज १६०० कोटींवर आला आहे. याबाबत राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे कोर्टाकडून निर्देश देण्यात आले आहेत.
सिंधुदुर्गातीलवैभववाडीत सुरु असलेल्या अरुणा धरण प्रकल्पाच्या कामात हजारो कोटींचा घोटाळा झाल्याप्रकरणी हायकोर्टाने राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे या कामामुळे तीन गावं पाण्याखाली जाणार असून १८०० प्रकल्पाग्रस्तांचे पुनर्वसन न करताच धरण बांधण्याच्या कामास सुरुवात झाली आहे, असा आरोप करत स्थानिक रहिवासी तानाजी कांबळे यांनी वकील आशिष गिरी यांच्यामार्फत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची दखल घेत न्या. अजय गडकरी आणि न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला १७ जूनला होणाऱ्या पुढील सुनावणीत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.