धारूर (बीड ) : 200 व 500 च्या बनावट नोटा छपाई प्रकरणी एका तरुणास मेन रोडवरील ग्राहक सेवा केंद्रातून बुधवारी (दि.9) सकाळी ११ वाजेच्या सुमारास औरंगाबाद पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. आकाश संपती माने असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून 200 व 500 रुपयांच्या बनावट नोटा, प्रिंटर आणि संगणक पोलिसांनी जप्त केले आहे.
औरंगाबाद येथील टिव्ही सेंटर भागात दोघेजण नकली नोटा चलनात आणत असल्याची माहिती सिडको पोलिसांना मिळाली. यावरून पोलिस निरिक्षक अशोक गिरी यांच्या आदेशावरुन सिडको पोलिसांनी संदीप आरगडे व निखिल संबेराव ( रा. बेगमपेठ ) यांना ताब्यात घेतले. यावेळी दोघांकडून १ लाख ५० हजाराच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या. चौकशीत आरोपींनी दिलेल्या माहितीवरुन मुख्य आरोपी धारूर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीवरून औरंगाबादच्या सिडको पोलीस स्थानकाच्या गुन्हे अन्वेषण पथकाने धारुर येथील एका ग्राहक सेवा केंद्रात छापा मारला. यावेळी काही बनावट नोटा व छपाईचे साहित्य आढळून आले. पोलिसांनी आकाश संपती माने यास ताब्यात घेतले. नोटा, प्रिंटर व संगणक जप्त करून पोलीस आरोपीसह औरंगाबादकडे रवाना झाले. ही कारवाई पोलीस उपनिरिक्षक बाळासाहेब आहेर यांच्यासह पो.हे.कॉ. नरसिंग पवार, दिनेश बन, सुभाष शेवाळे, प्रकाश डोंगरे, विशाल सोणवने, गणेश नागरे, सुरेश भिसे, स्वप्नील रत्नपारखी यांच्या पथकाने केली.