शहागड (जि. जालना) : बनावट नोटा प्रकरणात शहागड पोलिसांनी एकाला अटक केली असून, अटकेतील आरोपीकडे केलेल्या चौकशीत नकली नोटांचे कनेक्शन पश्चिम बंगालपर्यंत असल्याची माहिती समोर आली आहे. नकली नोटांचे रॅकेट समोर येत असून, इतर आरोपींच्या शोधार्थ पथक रवाना झाले आहे.
शहागड येथील बसस्थानकासमोरील एका कापड दुकानात दोन हजार रूपयांच्या नकली नोटा घेऊन कापड खरेदीसाठी दोघे आले होते. व्यापाऱ्याला संशय आल्याने त्याने पोलिसांना बोलावून एकाला पकडले. तर दुसरा व्यक्ती दुचाकीवरून पसार झाला होता. या प्रकरणात परमेश्वर मारुती कानगुडे (रा. गेवराई, जि. बीड) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. कानगुडे याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर घनसावंगी तालुक्यातील एक, गेवराई तालुक्यातील दोन तर पश्चिम बंगाल मधील दोन अशी पाच जणांची टोळी या प्रकरणात असल्याचे समोर आले आहे. नकली नोटांचे कनेक्शन पश्चिम बंगालपर्यंत असल्याने मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे. इतर आरोपींना पकडण्यासाठी पथके रवाना झाली आहेत.
कानगुडे पोलीस कोठडीतनकली नोटा प्रकरणात अटक केलेल्या परमेश्वर कानगुडे याला पोलिसांकडून रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने कानगुडे याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे यांनी सांगितले.