नालासोपारा - तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील संतोष भवन परिसरातील तांडा पाडा विभागात राहणाऱ्या एकाचा अश्लील व्हिडीओ बनवून त्याला ब्लॅकमेल करण्याची घटना समोर आली आहे. कंटाळलेल्या व्यक्तीने तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर बुधवारी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत दोघांना अटक केले आहे.
नालासोपारा पूर्वेकडील गावराई पाडा येथील जीवन नगरमध्ये राहणारा बबलू जगत बहादूर सिंग (30) हा मुंबईत प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला आहे. त्याची ओळख तांडापाडा विभागात राहणाऱ्या पिंकी या महिलेशी होती. तिच्या घरी 23 एप्रिल ला रात्री साडे आठच्या सुमारास गेला होता. महिलेशी करत असलेले अश्लील चाळे तिच्या दुसऱ्या साथीदारांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण करून ठेवले. त्या आरोपी महिलेने आणि तिच्या साथीदारांनी बबलूला व्हिडीओ वायरल करण्याची धमकी देत 15 हजार रुपये मागितले. पण इतके पैसे नसल्याने बबलूने 10 हजार रुपये देण्याचे कबुल केले पण परत या पाचही ब्लॅकमेल करणाऱ्यांनी 15 हजार रुपये मागितले आणि नाही दिले तर सोशल मीडियावर हा व्हिडीओ वायरल करण्याची व जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. बबलूला कळले की या चौघांनी या महिलेसोबत मिळून मला फसवत ब्लॅकमेल करत आहे म्हणून शेवटी त्याने कंटाळून तुळींज पोलीस ठाण्यात जाऊन हकीकत सांगत तक्रार दिली. तुळींज पोलिसांनी बुधवारी अल्दुल कय्यूम अब्दुल रहीम शाह, 17 वर्षीय अल्पवयीन तरुण, चिकन्य्या, रिक्षा चालक नासिरा आणि पिंकी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. सर्व आरोपी हे संतोष भवन परिसरात राहणारे असून 17 वर्षीय आरोपी तरुणाला भिवंडी न्यायालयात हजर केले असता बालसुधारगृहात पाठवले आहे तर दुसरा आरोपी अल्दुल कय्यूम अब्दुल रहीम शाह (20) याला अटक करून वसई न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर बाकीच्या फरार तीन आरोपींचा शोध पोलीस घेत असल्याचे तपास अधिकारी आणि पोलीस उपनिरीक्षक विशाल रूमने यांनी सांगितले आहे.