मुंबई - शिवसेना उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी आणि नगरसेविका शीतल म्हात्रे यांना ट्विटरद्वारे जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी बोरीवली येथील एम. एच. बी काॅलनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल ही धमकी प्रियंका चतुर्वेदी आणि शीतल म्हात्रे यांच्या ट्विटरवर देण्यात आली होती.
धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव आशिष केआर द्विवेदी असे आहे. @ASHISHKRDW2 या ट्विटर अकाउंटवरून ही धमकी देण्यात आली आहे. 'तुम्हे गोली न मारी तो याद रखना', अशी धमकी या व्यक्तीने दिली आहे. सर्वप्रथम शीतल म्हात्रे यांच्या ही बाब लक्षात आली. याचे गांभीर्य लक्षात घेऊन म्हात्रे यांनी लगेचच बोरीवलीतील एम. एच. बी. कॉलनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून कलम ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तांत्रिक पुराव्यांचा आधार घेऊन आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शीतल म्हात्रे यांच्या म्हणण्यानुसार, सायंकाळी साडे चारच्या सुमारास ट्विटर अकाउंट तपासत असताना त्यांना हा धमकीचा मेसेज दिसला. या मेसेजचा स्क्रीनशॉटही पोलिसांकडे सादर केला आहे.