कळमनुरी (हिंगोली ) : ‘तुझ्यावर कोणीतरी करणी केली असून उपचार करावे लागतील, नाहीतर तुझा जिवही जाऊ शकतो’ असे म्हणत जादूटोण्याच्या नावाखाली उपचाराच्या बहाण्याने एका मुलीवर अनैसर्गिक कृत्य केल्याची खळबळजनक घटना कळमनुरी येथे उघडकीस आली. याप्रकरणी भोंदूबाबा आणि त्याला मदत करणाऱ्या एका विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, अकोला येथील एका १७ वर्षीय मुलीस दोन इसमांनी ‘तुझ्यावर जादूटोणा करून करणी केली आहे, त्यामुळे बाहेरचा इलाज करावा लागेल’ इलाज केला नाही तर जीवही जाऊ शकतो असे म्हणून २१ जून २०१८ रोजी कळमनुरी येथील शेतशिवारात आणले होते. इलाज करण्याच्या नावाखाली आरोपी शेख कौसर शेख अफसर याने मुलीसोबत बळजबरी करून अनैसर्गिक कृत्य केले. तसेच त्याचे चित्रीकरण केले. यानंतर अनैसर्गिक कृत्याचे चित्रिकरण पसरविण्याची धमकी देवून शेख कौसर हा पीडित मुलीकडे वेळोवेळी पैशाची मागणी करू लागला. तसेच याची बाहेर वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर मुलीने याप्रकरणी कळमनुरी ठाण्यात तक्रार दाखल केली.
पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी शेख कौसर शेख अफसर व हे कृत्य करण्यास आरोपीला मदत करणाऱ्या वाहनचालक शेख चाँद दोघे रा. सावरखेडा जिल्हा बुलढाणा या दोघांविरूद्ध कलम ३७६, ३७७, ३८४, ५०६, ३४, भादंवि सहकलम ४, ६, १४ बाललैंगिक अत्याचार कायदा अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि आडे करीत आहेत.