सोलापूर : साठ लाख रुपये न दिल्यास जिलेटीनच्या कांड्यांच्या सहाय्याने हॉटेल व्यावसायीकाला हॉटेल उडवून देण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात घडला आहे. याबाबत प्रियदर्शन हर्षवर्धन शहा ( वय ५६, रा. सुखकर्ता, रेल्वे लाईन ) यांनी सदर बाझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १५ ते २६ डिसेंबर दरम्यान घडली. या प्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी हे शहरातील हॉटेल व्यवासायीक असून त्यांना १५ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमाने फिर्यादीचे राहत्या घरामध्ये चिठ्ठी टाकून २० लाख द्या नाहीतर जिलेटीन कांड्या लावून तुमचे लोटस हॉटेल उडवून देतो, अशी धमकी दिली. त्यानंतर २६ डिसेंबर रोजी ४ वाजण्याच्या सुमारास घरात पुन्हा चिठ्ठी टाकून ४० लाख रुपये द्या नाहीतर तुमचे हॉटेल मध्ये राहत असलेल्या व्यक्तीसह जिलेटीन कांड्या लावून तुमचे लोटस हॉटेल उडवून देतो, अशी धमकी दिली. याप्रकरणी रिक्षा क्र. एम एच १३ सी टी ५१८७ या चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.