मुंबई : कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या मुलाखतीनंतर मुंबई पोलिसांनी खबरदारी म्हणून अभिनेता सलमान खान याच्या सुरक्षेचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्या पाठोपाठ शनिवारी सलमानला पुन्हा धमकीचा ईमेल आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोईसह तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
प्रशांत गुंजाळकर यांच्या तक्रारीवरून पोलिस अधिक तपास करत आहेत. प्रशांत सलमानचे मित्र असून, त्यांची आर्टिस्ट मॅनेजमेंटची कंपनी आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने एका नवीन मुलाखतीत सलमान खानला पुन्हा एकदा धमकी दिली आहे. प्रसिद्धीसाठी नव्हे, तर एका हेतूसाठी आम्ही त्याला मारणार आहोत. प्रसिद्धी किंवा पैशासाठी कोणाला मारायचे असते, तर आम्ही शाहरुख किंवा बॉलीवूडच्या कोणत्याही बड्या व्यक्तीला मारले असते, असेही लॉरेन्स म्हणाला आहे. गेल्या वर्षीही सलमानला ठार मारण्याची धमकी आली होती.
ईमेलमध्ये काय?पोलिसांकडून सुरक्षेचा आढावा घेण्यात येत असताना, शनिवारी सलमानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील कार्यालयात दुपारी पावणेदोनच्या सुमारास धमकीचा ईमेल आला. त्यात गोल्डीभाई को सलमानसे बात करनी है, तसेच लॉरेन्स बिश्नोई याची मुलाखत बघितली असेलच, त्याने बघितली नसेल, तर बघायला सांग. प्रकरण मिटवायचे आहे. समोरासमोर बसून बोलायचे आहे. आता सांगितले आहे, पुढच्या वेळी झटका देऊ, अशा हिंदी आशयातील मजकुराचा त्यामध्ये समावेश आहे. त्यानुसार, त्यांनी रोहित गर्ग, गोल्डी भाई आणि लॉरेन्स बिष्णोई विरोधात तक्रार दिली आहे.