लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स (सीएसएमटी ) आणि कुर्ला रेल्वे स्थानकावर आत्मघातकी हल्ला करण्याचा फोन गुरुवारी रात्री रेल्वे पोलिसांना आला. त्यानंतर लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने रात्रभर सदर परिसर पिंजून काढला. त्यांच्या हाती काहीच लागले नाही. कॉलरची ओळख रमाकांत ठाकूर अशी झाली आहे. त्याला जबलपूरमधून ताब्यात घेण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे पोलिसांच्या साऊथ कंट्रोल रूमला हा फोन करण्यात आला होता. ज्याची माहिती त्यांनी रेल्वे पोलिसांना देत सदर परिसर तपासणी करण्यास सांगितले. त्यानंतर लोहमार्ग पोलीस आणि अरपीएफने, श्वान पथकाच्या मदतीने सीएसएमटी आणि कुर्ला रेल्वे स्थानकाच्या सर्व प्लॅटफॉर्म परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले.
मध्यरात्रीपर्यंत पोलीस कोणती संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती याठिकाणी दिसते का, याचा शोध घेत होते. तसेच या दोन्ही ठिकाणाहून सुटणाऱ्या किंवा येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या तसेच प्रवाशांच्या सामानाची देखील पडताळणी यावेळी करण्यात आली. मात्र, त्यांना काहीच संशयास्पद सापडले नाही. त्यामुळे हा खोडकरपणा असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यानुसार कॉलरचा शोध घेण्यास त्यांनी सुरवात केली ज्यात तो जबलपूरचा राहणारा असून कॉल ज्या क्रमांकावरून करण्यात आला त्याचे नाव रमाकांत ठाकूर असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे रेल्वे पोलीस मुख्य आरोपीला लवकरच अटक करणार असून यामागचे नेमके कारण काय हे समजू शकेल, असे एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. याप्रकरणी रेल्वेचे पोलीस आयुक्त कैसर खालीद यांनी ट्विट करत सर्च ऑपरेशनचे फोटो शेअर केले आहेत.