मुंबई : मेमरी कार्ड असल्याचे भासवून तब्बल साडेतीन हजार आयफोन हवाईमार्गे मुंबईत आणल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. महसूल गुप्तचर यंत्रणेने (डीआरआय) तस्करांची ही क्लृप्ती हाणून पाडत ४२.८६ कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हाँगकाँगहून आयात केलेल्या दोन खोक्यांत मेमरी कार्ड असल्याचे नमूद करण्यात आले होते. ही खोकी मुंबई विमानतळाच्या एअर कार्गो संकुलात आणली असता डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. संशय बळावल्याने खोकी उघडून कसून तपासणी करण्यात आली. त्यात सुमारे २ हजार २४५ आयफोन १३ प्रो, १ हजार ४०१ आयफोन १३ प्रो मॅक्स, १२ गुगल पिक्सल फोन आणि ॲपल स्मार्ट वॉचचा समावेश होता. मेमरी कार्ड असल्याचे भासवून हा माल मुंबईत आणण्यात आला होता. सीमाशुल्क कायदा १९६२ अंतर्गत हा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आयातदारांची चौकशी सुरू आहे.
भारतात १३ सप्टेंबर २०२१ पासून आयफोन १३ हे मॉडेल विक्रीस उपलब्ध झाले. त्याची मूळ किंमत ७० हजार इतकी असून, अत्याधुनिक श्रेणीतील मॉडेल्सची किंमत १ लाख ८० हजारांपर्यंत आहे. भारतात परदेशातून मोबाईल आयात करायचे झाल्यास ४४ टक्के सीमाशुल्क आकारले जाते. हा कर चुकवल्यास एका फोनमागे निव्वळ २५ ते ३० हजारांचा नफा कमावता येतो. त्यामुळे तस्करांनी ही क्लृप्ती योजल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. गैरमार्गाने मोठ्या संख्येने आयात केलेले आयफोन जप्त करण्याची अलीकडच्या काळातील ही मोठी घटना असून, तस्करीचे असे प्रकार हाणून पाडण्यास डीआरआय सक्षम असल्याची माहिती देण्यात आली आहे.