मुंबई : कॉपर इरेडीयम या दुर्मीळ आणि अत्यंत महाग धातूच्या पुरातन वस्तूंची पारख करून ते ५ कोटींना विकण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याला ९ लाखांचा गंडा घालणाºया त्रिकूटाला गुन्हे शाखेने सात रस्ता भागातून अटक केली. गुन्हे शाखेच्या कक्ष २ ने ही कारवाई केली आहे.इरेडीयमच्या वस्तूंची परीक्षण प्रक्रिया ‘राइस पुलिंग’ या नावे ओळखली जाते. तांदळात इरेडीयमला आकर्षित करण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे धातू तांदूळ आकर्षित करून घेतो. भामट्यांच्या टोळ्या देशभरातील श्रीमंतांना गाठून इरेडीयमच्या पुरातन वस्तू बाजारात विकून शेकडो कोटींचा नफा कमावण्याचे आमिष दाखवतात. त्याआधी पारख प्रक्रिया करण्यासाठी लाखो रुपये गुंतवून घेतात. अशाच प्रकारे तक्रारदार व्यावसायिकास ६ ते ७ लाखांची गुंतवणूक केल्यास हा धातू ५ कोटींना विकून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यानुसार त्याने सुरुवातीला ९ लाख रुपयांची गुंतवणूक केली.पुढे त्रिकूटाने त्यांच्याकडे असलेल्या तांब्याच्या भांड्यामध्ये केमिकल टाकून दोन दिवस धातूचे भांडे बनविण्याचा प्रयोग केला. सदर भांड्यामध्ये रेडीएशन पॉवर न आल्याने त्रिकूटाने त्यांच्याकडे आणखी पैशांची मागणी केली. यात संशय आल्याने त्यांनी नकार देत गुन्हे शाखेच्या कक्ष २ कडे तक्रार दिली.त्यानुसार, कक्ष २ चे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय निकुंबे, पोलीस निरीक्षक अर्जुन जगदाळे, साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे, गणेश केकाण, साहाय्यक फौजदार आरिफ पटेल, अंमलदार नंदकुमार बेळणेकर, अविनाश निंबाळकर, योगेश उतेकर, प्रशांत तिथमे, हृद्यनारायण मिश्रा, राजेश सोनावणे यांनी मंगळवारी सापळा रचून त्रिकूटाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडील तांब्याची कढईदेखील ताब्यात घेण्यात आली़ मीरा रोड येथील खासगी ठेकेदार सलीम हश्मतअली खान (४७), भिवंडीतील दलाल मोहम्मद शरीफ युनूस अन्सारी (४५) आणि बांधकाम व्यावसायिक करीम रजाक सय्यद (३६) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
राइस पुलिंगद्वारे गंडा घालणारे त्रिकूट जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 4:14 AM