पिंपरी : सोनसाखळी चोरीचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहून त्यानुसार सोनसाखळी चोरणाऱ्या तीन आरोपींना वाकड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सहा गुन्हे उघडकीस आले असून, १० तोळे सोन्याचे दागिने आणि दोन दुचाकी असा तीन लाखांचा ऐवज हस्तगत केला.
महम्मद आरिफ उस्मानअली सय्यद, आयुब रियासत अली (दोघे रा. कस्पटे वस्ती, वाकड, मूळ रा. उमरीकला, जि. मुरादाबाद, उत्तर प्रदेश), फहीम मतीन सिद्दीकी (रा. फुल चौक, धुळे, मूळ रा. उमरीकला, जि. मुरादाबाद, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाकडमधील उत्कर्ष चौक येथे तीन जण संशयितरीत्या फिरत असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चौकात सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी वाकड, थेरगाव परिसरातील पादचारी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी, तसेच दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांना अटक करून त्यांच्याकडून दहा तोळे सोन्याचे दागिने आणि दोन दुचाकी असा एकूण तीन लाखांचा ऐवज हस्तगत केला. या कारवाईत वाकड पोलीस ठाण्यातील सहा चोरीचे गुन्हे उघडकीस आले.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजण, उपनिरीक्षक हरीश माने, कर्मचारी डी. डी. सणस, बापूसाहेब धुमाळ, बिभीषण कन्हेरकर, नितीन ढोरजे, जावेद पठाण, सुरेश भोसले, रमेश गायकवाड, विक्रम जगदाळे, दीपक भोसले, श्याम बाबा, विजय गंभिरे, विक्रम कुदळ, प्रमोद कदम, नितीन गेंगजे, मधुकर चव्हाण, विक्रांत चव्हाण, नूतन कोंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.दुचाकी चोरून केली सुरवातआरोपींचा काच विक्रीचा व्यवसाय होता. मात्र, त्या व्यवसायात कोठेही काचेचा ठेका मिळत नव्हता. दरम्यान त्यांनी सोशल मीडियावर सोनसाखळी चोरीचे व्हिडिओ पाहून त्याचा अभ्यास केला. त्यानुसार सोनसाखळी चोरल्या. हे गुन्हे करण्यासाठी त्यांनी सुरुवातीला एक दुचाकी चोरली. त्यानंतर गर्दी आणि आठवडे बाजाराच्या ठिकाणी जाऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केले.