लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : संयुक्त अरब अमिराती (यूएई) मधील शारजाह येथे मुंबई इंडियन्सविरुद्ध दिल्ली कॅपीटल या दोन संघात सुरु असलेल्या इंडियन क्रिकेट लिग सामन्यावर सट्टा (बेटींग) खेळणाऱ्या चिरंजीव आहुजा (२९, रा. उल्हासनगर, ठाणो) याच्यासह तीन बुकींना ठाणो गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने शनिवारी अटक केली. त्यांच्याकडून १२ लाखांच्या रोकडसह १३ लाख ८१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी दिली.
मुंबई इंडियन्सविरुद्ध दिल्ली कॅपीटल या दोन संघातील सामने शारजाह याठिकाणी चालू होते. त्याचे टीव्हीवर आणि इंटरनेटवर प्रक्षेपण चालू होते. त्याचदरम्यान २ ऑक्टोंबर २०२१ रोजी बजाज व्हिला, गुरुद्वाराजवळ, उल्हासनगर क्रमांक तीन, ठाणे याठिकाणी क्रिकेटवर बेटींग होत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव यांना मिळाली. याआधारे होनराव यांच्या पथकाने २ ऑक्टोंबर रोजी दुपारी ५.३५ वाजण्याच्या सुमारास याठिकाणी छापा टाकला. या कारवाईमध्ये आहुजा तसेच राहूल बजाज (२९, उल्हासनगर, ठाणे) आणि धर्मेंद्र बजाज उर्फ कल्लु (५३, रा. उल्हासनगर, ठाणे) यांना इंटरनेटद्वारा मोबाईलवर क्रिकेटचे सामने लावून लॅपटॉप आणि १३ मोबाईलच्या सहाय्याने बेटींग (सट्टा) खेळताना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून एक लॅपटॉप, १३ मोबाइल, एक इंटरनेट राउटर, ट्रान्समिशन मशिन आणि १२ लाखांची रोकड असा १३ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. हे तिघेही वेबसाईटचा वापर करून ‘हारजीत’चा हिशोब लॅपटॉपमधील एका सॉफ्टवेअरमध्ये नोंदवून ठेवत होते. आहुजासह तिघांनी त्यांना या बेटींगची आयडी आणि पासवर्ड हे चेतन भाई यांनी पुरविल्याचे आणि ‘हारजीत’ने चेतनभाई हे त्याच्या खास व्यक्तीमार्फत घेऊन जात असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ठाणे न्यायालयाने या तिघांनाही ६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.