पुणे : पुण्यातील नामवंत आणि आघाडीच्या सराफांना ५० कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या तिघांना खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. आशिष हरिचंद्र पवार (वय २७, रा. लक्ष्मीनगर, सहकारनगर), रमेश रामचंद्र पवार (वय ३२, रा़ प्रेमनगर, मार्केट यार्ड) आणि रुपेश ज्ञानोबा चौधरी (वय ४५, रा. तुळशीबागवाले कॉलनी, सहकानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहे. यातील आशिष पवार हा या सराफाकडे काही दिवसांपर्यंत बॉडीगार्ड म्हणून काम करीत होता. रमेश पवार हा त्यांच्या घरी काम करीत होता. चौधरी हा विकसक म्हणून काम करतो. याप्रकरणी नामवंत सराफांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, हे तिघेही या सराफांच्या ओळखीचे आहेत. त्यांनी या सराफाकडून यापूर्वी काही पैसे उसने घेतले होते. उसने घेतलेले पैसे त्यांनी अद्याप परत केले नव्हते.
त्यांना पैशाची गरज असल्याने त्यांनी हा खंडणीचा मार्ग अवलंबिला. त्यांचा बॉडीगार्ड म्हणून काम करणारा आशिष पवार आणि रुपेश चौधरी यांनी त्यांच्या घरी काम करणारा रमेश पवार याला हाताशी धरले. त्याच्या मदतीने तयार केलेली व्हिडिओ क्लिप फिर्यादींना दाखवून ती व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यांच्याकडे ५० कोटी रुपयांची मागणी केली. त्यानंतर त्यांच्यात २ ते ३ वेळा बैठका झाल्या. तेव्हा त्यांनी आपली मागणी ५ कोटी रुपयांपर्यंत कमी केली. या दरम्यान, आशिष याने दोन वेळा त्यांना पिस्तूल दाखवून या प्रकरणाची वाच्यता पोलिसांकडे केल्यास त्याच पिस्तुलातून गोळ्या घालून ठार करण्याची धमकी दिली. त्यानंतरही सराफाने इतके पैसेही आम्ही देऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितल्यावर त्यांनी गेल्या ४ दिवसांपासून त्यांना धमक्या देण्यास सुरुवात केली. त्यानंतर या सराफाने पोलिसांकडे धाव घेतली. हा प्रकार समजल्यावर पोलिसांनी त्यांचे लोकेशन शोधून काढले. त्या वेळी ते टिळक रोडवरील स. प. महाविद्यालयाजवळील हॉटेल कॅफे कॉफी डे येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्यांना पकडले. या तिघांनाही अटक करण्यात आली असून दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते अधिक तपास करीत आहेत.