नालासोपारा (मंगेश कराळे): दिवसा घरफोडी करुन चोरी करण्याऱ्या तीन सराईत आरोपींना अटक करण्यात माणिकपूरच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे. तिन्ही आरोपीकडून पोलिसांनी लाखोंचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी शुक्रवारी दिली आहे.
आनंद नगरच्या अंबा भवन येथे राहणाऱ्या कल्पना मोरे (६५) यांच्या घरी ७ मार्चला दुपारी दिवसाढवळ्या लाखोंची चोरी झाली होती. चोरट्याने घराचा सेफ्टी दरवाजा तोडून घरात प्रवेश करत लोखंडी कपाटातील पेटीमध्ये असलेले १७६ ग्रॅम सोन्याचे दागिने, १०० ग्रॅम चांदीचे दागिने आणि ४ लाखाची रोख रोख रक्कम असा एकूण ११ लाख २४ हजारांच्या मुद्देमालाची चोरी झाली होती. माणिकपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे माणिकपुर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी अंमलदार यांनी गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवून घटनास्थळावरील मिळालेल्या माहितीच्या व तब्बल १५० ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेरे तपासूत ३ आरोपींची ओळख पटवून बातमीदार यांचे मदतीने आरोपींची नाव निष्यन्न केले.
तांत्रिक विश्लेषण करुन गुन्हयातील आरोपी हे गोरखपुर एक्सप्रेसने जात असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली. तेव्हा नाशिकच्या मध्य रेल्वे पोलीसांचे मदतीने आरोपी राकेश कुमार उर्फ चक्की (३३), मोहम्मद सईद उर्फ शानु खान (३७) आणि लालकेसर ऊर्फ बच्चा राय (२७) यांना ताब्यात घेवून अटक केली आहे. आरोपीकडून ४ लाख ६७ हजार ५६८ रुपये किंमतीचे १०१ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि २ लाख ६९ हजार ८०० रुपयांची रोख रक्कम व २ मोबाईल फोन असा एकूण ७ लाख ५२ हजार ३६८ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच आरोपींनी सदर गुन्हयात वापरलेली ६० हजार रुपये किंमतीची दुचाकी हस्तगत केली आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात राकेश विरुद्ध १, मोहम्मद सईद विरुद्ध ४ आणि लालकेसर विरुद्ध २ असे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बड़े यांचे मार्गदर्शनाखाली माणिकपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने, पोलीस निरीक्षक (प्रशासन/गुन्हे) संतोष चौधरी, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सनिल पाटील, पोलीस हवालदार शैलेश पाटील, धनंजय चौधरी, शामेश चंदनशिवे, गोविंद लवटे, आनंदा गडदे, प्रवीण कांदे, भालचंद्र बागुल, मोहन खंडवी, पुजा कांबळे, अमिषा पाटील यांनी पार पाडली आहे