उल्हासनगर - हॉटेल व्यावसायिक आसन बालानी यांची ४६ लाख ६१ हजाराची फसवणूक करणाऱ्या बजाज अलायन्स जीवन विमा पॉलिसीच्या रिलेशनशिप मॅनेजरसह दोघावर गुन्हा दाखल करून अटक केली. अधिक तपास मध्यवर्ती पोलीस करीत आहेत.
उल्हासनगरातील हॉटेल व्यावसायिक आसन बालानी यांनी स्वत:सह पत्नी पूजा बालानी यांची बजाज अलायन्स या जीवन विमा कंपनीची उल्हासनगर शाखेमध्ये वर्षाला प्रत्येकी एक लाखांचा हप्ता असलेला जीवन विमा २०१० मध्ये काढला होता. २०३० मध्ये या जीवन विम्याचे हप्ते पूर्ण होऊन त्याद्वारे बालानी यांना प्रत्येकी ४६ लाख ६१ हजार रुपये मिळणार होते. दरम्यान मार्च महिन्यात बजाज अलायान्स कंपनीची एक कर्मचारी आसन बालानी यांच्या घरी आली. त्यांनी पूजा बालानी यांचा एक फोटो मोबाईलमध्ये काढला. तसेच केवायसी अपडेट करीत असल्याचे सांगत ओटीपी घेतला. त्यानंतर आसन बालानी यांनी तिला कार्यालयात भेटण्यास बोलावले. तेव्हा ह्या महिलेने आसन बालानी यांना त्यांच्या विम्यात नुकसान होत असून दुप्पट फायदा हवा असल्यास जुना जीवन विमा तोडण्याची मागणी केली. मात्र आसन यांनी विरोध केला. असे असतानाही त्या दिवशी तिने जुनी विमा पॉलिसी तोडून नवीन जीवन विमा काढली.
पूजा बालानी यांनी विरोध करताच जुनी पॉलिसी कंपनीने रद्द केली. त्यानंतर आसन बालानी यांनी पॉलिसी तपासली असता त्यांना धक्का बसला. २०२० मध्ये संगणकाच्या सिस्टीममधून आसन बालानी यांचा मोबाईल नंबर काढून त्याजागी मिनू झा यांचा मोबाईल नंबर टाकलेला होता. तसेच फोटोही बदललेला होता. त्यानंतर वर्षाला चार लाख रुपयांचा हप्ता असलेले दोन नवीन जीवन विमा काढले होते. त्याच्या हप्त्याचे पैसे जुन्या जीवन विम्याच्या जमा रक्कम मधून वळते केले होते. बालानी यांनी याबाबत कंपनीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर, मध्यवर्ती पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली. पोलीस उपायुक्त प्रशांत मोहीते, सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास सुरु केला. या घटनेची चौकशी केल्यानंतर मध्यवर्ती पोलिसांनी तीन जणांच्या विरोधात ४६ लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. दरम्यान पोलिसांनी मिनू झा, विकास गोंड, अनुज मढवी या तीन जणांना अटक केली.