राजकुमार जाेंधळे, लातूर / अहमदपूर: कोयत्याने वार करुन पिग्मी एजंटाला लुटणाऱ्या तिघांच्या अहमदपूर पाेलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यातील पळविलेली रक्कम, बॅग, दुचाकी, कोयता असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, ७ ऑक्टोबर रोजी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास अहदपुरातील टेंभुर्णी रोडवर घराकडे दुचाकीवरून जात असताना तिघांनी पाठलाग करून एका पिग्मी एजंटाला लुटल्याची घटना घडली. अहमदपूर शहरात दिवसभर पिग्मीचे पैसे गाेळा करून हा एजंट घराकडे जात हाेता. यावेळी त्यांची दुचाकी अडवून तिघांनी त्यांच्याकडील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी प्रतिकार केला असता, त्यांच्यावर कोयत्याने वार करून पैशाची बॅग पळविली. याबाबत अहमदपूर ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याच्या तपासाचे जिल्हा पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेश दिले. त्यानुसार पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी, अहमदपूरचे डीवायएसपी मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदपूर ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या पथकाने आरोपी शाेध घेतला. दरम्यान, गुन्ह्याचा तपास करत असलेल्या पथकाला टेंभुर्णी रोडवर पिग्मी एजंटला अडवून कोयत्याने मारहाण करून लुटमार करणाऱ्या आरोपींची माहिती मिळाली.
या माहितीवरून पथकाने पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथून शुभम प्रकाश जाधव (वय २२, रा. काळेगाव, ता. अहमदपूर), वसंत शिवाजी वाडीकर (२१, रा. अहमदपूर), जहीर इस्माईल शेख (१९, रा. लेक्चर कॉलनी, अहमदपूर) यांना अटक केली. आरोपींची चाैकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली. तपास पोलिस उपनिरीक्षक सूर्यवंशी करत आहेत. ही कारवाई अंमलदार तानाजी आरदवाड, ज्ञानोबा देवकते, राजकुमार डबेटवार, बापू धुळगुंडे, रुपेश कज्जेवाड, पाराजी पुठेवाड, खयूम शेख, विशाल सारोळे, बाळू मामाडगे यांच्या पथकाने केली आहे.