लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलने मोतिबाग रेल्वे कर्मचारी क्वॉर्टर परिसरात गांजा तस्करी करणाऱ्यांच्या टोळीला अटक केली आहे. पोलिसांनी तिघांना अटक करून गांजासह ५.१९ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.श्रीराम ऊर्फ भुऱ्या कालीचरण श्रीवास (३०) रा. मोतिबाग झोपडपट्टी, एजाज अहमद अब्दुल गफ्फार (३५) रा. गंजीपेठ आणि दीपक पांडुरंग चव्हाण (२५) रा. कलामंदिर, मोतिबाग, अशी आरोपींची नावे आहेत. या टोळीचा सूत्रधार शेख सलीम फरार झाला आहे. एनडीपीएस सेलला मोतिबाग रेल्वे क्वॉर्टरजवळ गांजा आल्याची माहिती समजली. त्याआधारे पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांना मोतिबाग रेल्वे क्वॉर्टरच्या मार्गावर तीन सीटर ऑटो संशयास्पद स्थितीत आढळला. ऑटोची तपासणी केली असता त्यात २९ किलो ७४९ ग्राम गांजा आढळला. त्याची किंमत २.६७ लाख रुपये आहे. पोलिसांनी ऑटो, गांजा आणि तेथे उभी असलेली दुचाकी जप्त करून आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी शेख सलीमच्या मदतीने गांजाची विक्री केल्याची माहिती दिली. सलीम या टोळीचा सूत्रधार आहे. तो श्रीराम आणि दीपकच्या मदतीने गांजाची विक्री करतो. एजाज ऑटो चालक आहे. त्याच्या मदतीने गांजाची वाहतूक करण्यात येते. आरोपी अनेक दिवसांपासून गांजाची तस्करी करतात. पोलिसांना त्यांची माहिती मिळाली, परंतु ते हाती लागत नव्हते. बुधवारी दीपक चव्हाणने गांजा आपल्या घरी बोलावला होता. त्याची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपींना अटक केली. शहरात अनेक ठिकाणी गांजाची विक्री होते. गुन्हेगारी वाढण्यात गांजा तस्करीचे मोठे योगदान आहे. युवापिढीलाही गांजाचे व्यसन आहे. फरार शेख सलीम हाती लागल्यानंतर या टोळीची माहिती पुढे येऊ शकते. आरोपींविरुद्ध मादक पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सार्थक नेहेते, सहायक पोलीस निरीक्षक बयाजी करले, विजय कसोधन, उपनिरीक्षक मनीष गावंडे, सहायक उपनिरीक्षक विठोबा काळे, अजय ठाकूर, प्रदीप पवार, नृसिंह दमाहे, नामदेव टेकाम, नितीन मिश्रा राकेश यादव, नितीन रांगणे, सतीश निमजे, कपिल तांडेकर, कुंदा जांभुळकर, पूनम रामटेके, नरेश शिंगणे, नितीन साळुंके यांनी केली.
नागपुरातील मोतिबाग रेल्वे क्वॉर्टरजवळ गांजासह तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 11:22 PM
गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलने मोतिबाग रेल्वे कर्मचारी क्वॉर्टर परिसरात गांजा तस्करी करणाऱ्यांच्या टोळीला अटक केली आहे. पोलिसांनी तिघांना अटक करून गांजासह ५.१९ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ठळक मुद्दे५.१९ लाखाचा मुद्देमाल जप्त