ठाणे : तुझ्यामुळे आमची बहीण या जगात नाही, असे बोलून पूर्वाश्रमीचे मेव्हणे रूपेश गुंजाळ (२७) यांच्यावर छोट्या तलवारीने खुनीहल्ला करणारा चुलत मेव्हणा यश पवार याच्यासह तिघांना वागळे इस्टेट पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असून त्यास बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
वागळे इस्टेट येथे राहणारे रूपेश हे २५ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वागळे इस्टेट येथील रायलादेवी तलावासमोरील रस्त्याने मोटारसायकलवरून घरी जात होते. त्याचवेळी अचानकपणे त्यांच्या पहिल्या पत्नीचे चुलत भाऊ (मेव्हणे) यश पवार, आयुष ऊर्फ आऊ पवार आणि चुलत सासरे गणेश पवार यांनी त्यांना शिवीगाळ केली. ‘तुझ्यामुळे आमची बहीण या जगात नाही’, असे बोलून त्यांच्यावर यश याने तलवारीने डोळ्याच्या वर तर आयुष यानेही डोक्याच्या मागील बाजूस तलवारीने वार केले. गणेशनेही यांना मारहाण केली. त्यानंतर तुला सोडणार नाही, अशी धमकीही दिली.
याप्रकरणी मारहाण, शिवीगाळ आणि धमकीचा गुन्हा २६ फेब्रुवारी रोजी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड, प्रियतमा मुठे आणि निरीक्षक विजय मुतडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बी. एस. निकुंभ, ए. बी. म्हेत्रे, जमादार पवार, हवालदार चंद्रकांत वाळूंज आणि रोहन जाधव आदींच्या पथकाने १ मार्च २०२२ रोजी गणेश पवार (४३) आणि यश पवार (१८) या दोघांना सापळा लावून अटक केली. तर त्यांचा तिसरा साथीदार अल्पवयीन असल्याने त्याला भिवंडीतील बालसुधारगृहात पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली.