मुंबईतील झवेरी बाजारात ईडीचे अधिकारी असल्याचं भासवून छापा टाकून व्यावसायिकाची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. झवेरी बाजारातील एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर काल दुपारी दोनच्या सुमारात अज्ञातांनी ईडी अधिकारी असल्याचं सांगत बनावट छापा टाकला. बनावट अधिकाऱ्यांनी कार्यालयातून २५ लाख रुपये रोख आणि जवळपास तीन किलो सोनं लुटलं आहे. सोन्याची किंमत जवळपास १ कोटी ७० लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.
झवेरी बाजार लूट प्रकरणात एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली आहे. तसेच ३ संशयितांचा शोध सुरू आहे. सहा पथक आरोपीच्या मागावर होते. अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव विशाखा मुधूळे असं असून ती खेडची रहिवासी आहे. चोरी झालेल्या सोन्यापैकी अडीच किलो सोने हस्तगत करण्यात आले आहे.
व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी काही अज्ञात आरोपींविरुद्ध कलम ३९४, ५०६ (२) आणि १२० ब अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेट सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितलं. दरम्यान लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी या प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. तसंच आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे, दहिसर आणि इतर काही ठिकाणी पथकं रवाना झाली आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"