पुणे : बेकायदेशीर बांधकामाबाबत केलेल्या तक्रारीवरुन झालेल्या वादातून दूध वितरकाचा कोयत्याने वार करून खून करणा-या तिघांना चतु:श्रृंगी पोलिसांना अटक केली आहे.
मुख्य आरोपी प्रतीक सुनील कदम (वय १९), अमोल महादेव चोरमले वय २८ दोघेही रा . कस्तुरबा गांधी वसाहत, औंध) आणि आकाश आनंदा केदारी (वय २६ रा . आंबेडकरनगर औंध) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. रोहित अशोक जुनवणे (वय २८) यांचा गुरुवारी सकाळी औंध येथील कस्तुरबा वसाहतीत काही जणांनी कोयत्याने वार करून निर्घृण खून केला होता. त्यातील आरोपी हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर येथे लपून बसले आहेत, अशी माहिती यूनिट १ चे पोलीस नाईक सचिन जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा लावून त्यांना अटक करण्यात आली आली. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील कार्यवाहीसाठी त्यांना संबंधित पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
औंध येथील एका मॉलच्या अनधिकृत बांधकामाबाबत जुनवणे यांनी महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे तक्रार अर्ज केला होता. परंतु ही माहिती संबंधित बांधकाम करणा-या व्यक्तीला मिळाल्याने त्यांच्यात वाद झाला होता. त्याचबरोबर माथाडी कामगारांमधील वचस्वार्तून त्याचे माथाडी नेते दादा मोरे यांच्याबरोबरही तीन दिवसांपूर्वी वाद झाले होते. त्यांच्या घराबाबतही जुनवणे याने तक्रार दिली होती.रोहित यांच्यावर एका २२ वर्षांच्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदारांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडे होती. रोहित यांच्या डोक्यात दहापेक्षा जास्त वार करण्यात आले असून, त्याने हा हल्ला वाचविण्यासाठी हातमध्ये घातल्याने त्याच्या दोन्ही हाताची बोटे तुटली होती.
सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. रोहितला नागरिकांनी तातडीने जवळच्या हॉस्पिटलला नेले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. गुंडा विरोधी पथक पूर्व विभागाचे पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, सहायक पोलीस निरिक्षक गणेश पवार, पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील, कर्मचारी सचिन जाधव, इरफान मोमीन यांनी ही कारवाई केली.