मुंबई : पावणेतीन वर्षांपूर्वी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सोमवारी रात्री पुण्यातून एका तरुणीसह तिघा परिवर्तनवादी चळवळीतील तरुणांना अटक केली.
सागर तात्याराम गोरखे (वय ३२, रा. वाकड), रमेश मुरलीधर गायचोर (वय ३६, रा. येरवडा) व ज्योती राघोबा जगताप (वय ३३, रा. कोंढवा) अशी त्यांची नावे असून सर्व जण कबीर कला मंचचे सदस्य आहेत. त्यांचा बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याचा तपास यंत्रणेचा आरोप असून या सर्वा$ं$ना शुक्रवारपर्यंत एनआयए कोठडी मिळाली आहे.
पुण्यात शनिवारवाड्यासमोर ३१ डिसेंबर २०१७ रोजी कबीर कला मंचच्या वतीने एल्गार परिषद झालेली होती. त्या वेळी झालेल्या चिथावणीखोर भाषणामुळे १ जानेवारीला भीमा-कोरेगाव येथे दंगल झाली. या प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून पुणे पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले. मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर केंद्राने सात महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांकडून हा तपास एनआयएकडे वर्ग केला.
त्यानंतर या प्रकरणात फरारी असलेल्या डाव्या कट्टर विचारसरणीच्या नेत्यांनी कला मंच व इतर समविचारी संघटनेच्या कार्यकर्त्यांना भीमा-कोरेगाव येथील रस्ते आणि अन्य बाबीबद्दल माहिती पुरविली होती. त्याचप्रमाणे कला मंचच्या सदस्यांनी नक्षलवादी संघटनांशी हातमिळवणी करून शस्त्रे, स्फोटक चालविण्याबाबत प्रशिक्षण घेतले आहे. त्यानुसार एनआयएच्या पथकाने सोमवारी पुण्यात छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. सर्वांना मंगळवारी मुंबईतील विशेष न्यायालयात हजर केले असता त्यांना ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली.