मीरारोड - कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने दारूची विक्री बंद केल्याने मद्यपींना अव्वाच्या सव्वा भावाने काळ्या बाजारात दारू विक्री करणारे माफिया पुन्हा सक्रिय झाले आहेत . काशीमीरा भागात पोलिसांनी रिक्षातुन दारूची विक्री करणाऱ्या त्रिकुटास अटक केली आहे .
काशीमीरा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जावेद मुल्ला यांना बुधवारी रात्री माहिती मिळाली कि , स्नेहनागरी इमारतीच्या मागे रिक्षातून दारूची विक्री सुरु आहे . मुल्ला यांनी मोरे व मोहिले या पोलिसांसह रात्री सदर ठिकाणी छापा मारला असता रिक्षात देशी व विदेशी दारूच्या १२६ बाटल्या सापडल्या .
पोलिसांनी रिक्षा व दारूचा साठा असा ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे . दारूची तस्करी व काळ्याबाजारात विक्री करणाऱ्या सतीश केशव मानकरे (३२) रा . जनता नगर , काशीमीरा, प्रणव सुरेश भोईर ( २३ ) रा . शासकीय वसाहत वांद्रे व सौरभ सुरेश करडे ( २४ ) रा . टीचर्स कॉलनी , वांद्रे ह्या तिघांना अटक केली आहे .