म्हापसा - मूळचे जळगाव येथील असलेले पण सध्या म्हापसा शहराजवळच्या करासवाडा भागात भाडेपट्टीवर राहणाऱ्या आंतरराज्य चोरट्यांना म्हापसा पोलिसांनी मोबाइल चोरी प्रकरणी अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे अडीच लाख किंमतीचे मोबाइल व इतर साहित्य जप्त केले आहे. सदर संशयित आंतरराज्य चोरी प्रकरणात गुंतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
निरीक्षक कपील नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची कारवाई शुक्रवारी रात्री करासवाडा भागात करण्यात आली. विजय बेलडेकर (३३), सुरेश बेलडेकर (२८) व प्रकाश बेलडेकर (३२) अशी संशयितांची नावे आहेत. हे तीन्ही संशयित जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातल्या वनखोते परिसरातील रहिवासी आहेत. मागील सुमारे सात ते आठ महिन्यांपासून ते करासवाडा भागातील घोटणीचा व्हाळ भागात भाडेपट्टीवर रहात होते. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशी दरम्यान सदरचे मोबाइल त्यांनी मुंबईतील एका दुकानातून चोरल्याची माहिती दिली असल्याचे नायक यांनी म्हणाले. गोव्यात किंवा इतर ठिकाणी त्यांचा अशा प्रकारच्या गुन्ह्यात हात असण्याचा संशयही निरीक्षकांनी व्यक्त केला असल्याने त्यांची कसून चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे हे आंतरराज्य गुन्हेगार असण्याचा संशय पोलिसांना असल्याचे निरीक्षक म्हणाले. मागील काही दिवसापासून पोलीस त्यांच्या पाळतीवर होते.
पोलिसांनी विविध कंपन्यांचे ४१ मोबाइल हॅन्डसेट, ६२ मोबाइल चार्जर तसेच ४२५३ नगद रुपये मिळून अडीच लाख रुपये किंमतीचे साहित्य जप्त केले आहे. शहरातील एका दुकानावर त्यांनी ही चोरी केली असल्याचे केलेल्या चौकशी दरम्यान आढळून आले. निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार इर्शाद वाटांगे, सुशांत चोपडेकर, सर्वेश मांद्रेकर, लक्ष्मीकांत नाईक, विजय नाईक, अभिषेक कासार, प्रकाश पोळेकर, राजेश कांदोळकर, दिनेश साटेलकर यांनी कारवाईत भाग घेतला. सदर संशयिता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. लवकरच त्यांनी रिमांडासाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.