Sexual Harassment Case ( Marathi News ) : वारणसी येथील आयआयटी बीएचयू इथं शिक्षण घेणाऱ्या तरुणीची छेड काढून नंतर नग्न व्हिडिओ बनवल्याप्रकरणी तब्बल दोन महिन्यांनंतर तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. कुणाल पांडे, सक्षम पटेल आणि आनंद चौहान अशी आरोपींची नावे आहेत. या नराधमांनी तरुणीचा लैंगिक छळ करत नंतर जबरदस्तीने तिचा नग्न व्हिडिओ काढला होता. याप्रकरणात अटक करण्यात आलेले तीनही आरोपी भाजपच्या बड्या नेत्यांशी संबंधित असून ते भाजपच्या आयटी सेलचे पदाधिकारीही असल्याचं समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर रोजी वाराणसीत तरुणीच्या छेडछाडीची घटना घडली होती. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी या प्रकरणातील आरोपी भाजप नेत्यांच्या जवळचे असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येत नसल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अजय राय यांच्याविरोधातच तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र आता आरोपी हे भाजपशी संबंधित असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर अजय राय यांनी आक्रमक भूमिका घेत भाजपविरोधात जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय घडलं?
बीएचयू आयआयटी परिसरात १ नोव्हेंबर रोजी तीन तरुणांनी विद्यार्थिनीचा न्यूड व्हिडिओ तयार केला होता. हा प्रकार समोर येताच आयआयटी परिसरात विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन केलं. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी ३७६ (डी) कलमान्वये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र बरेच दिवस उलटल्यानंतरही आरोपींच्या अटकेची कारवाई करण्यात आली नव्हती.
दरम्यान, भाजप नेत्यांच्या दबावामुळेच पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केली नव्हती. मात्र स्थानिक पोलिसांतील काही अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर आता अटकेची कारवाई करण्यात आली आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी म्हटलं आहे.