नामदेव मोरेनवी मुंबई : दहशतवाद विरोधी पथकाच्या कांदीवली चारकोप युनीटने नवी मुंबईमधील घणसोली परिसरातून तीन बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. ते दोन वर्षांपासून येथे वास्तव्य करत असून बांधकाम मजूर व भंगार गोळा करण्याचे काम करत होते.
अटक केलेल्यांमध्ये कमल हुसेन अब्दुल शेख, माेहम्मद मिठु युसुफ खान व सिकंदर उकील मुल्ला यांचा समावेश आहे. नवी मुंबई परिसरात विनापरवाना वास्तव्य करणाऱ्या विदेशी नागरिकांविरोधात पोलिसंनी मोहीम सुरू केली आहे. दहशतवाद विरोधी पथकाला घणसोली सेक्टर ७ मध्ये काही बांगलादेशी नागरीक वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाली होती. सहायक पोलीस निरीक्षक सुभाशचंद्र पोस्टरे, अभिजीत पाटील व प थकामधील सदस्यांनी शुक्रवारी पहाटे सेक्टर ७ मधील डीमार्ट जवळील झोपडीमध्ये छापा टाकून तीन जणांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेला कमल हा बांधकाम मजूर म्हणून काम करत होता. मोहम्म्द खान व सिकंदर मुल्ला हे दोघे भंगार गोळा करण्याचे काम करत होते. त्यांच्याकडून दोन मोबाईल जप्त केले आहेत. त्यांच्या विरोधात रबाळे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.