लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: दहशतवाद विरोधी पथकाने नेरूळमधून तीन बांग्लादेशींना अटक केली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे ते नेरूळमध्ये वास्तव्य करत होते. एकाच कुटुंबातील तिघेही आहेत.
नेरुळ सेक्टर २० परिसरात घुसखोर बांग्लादेशी राहत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार सोमवारी रात्री त्याठिकाणी एटीएसचे पथक दाखल झाले होते. त्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे एका इमारतीमधील घराची झडती घेतली. यावेळी तिथे राहणाऱ्या कुटुंबातील तिघांकडे कागदपत्रांची चौकशी करण्यात आली. चौकशीत त्यांनी सादर केलेले आधार कार्ड व पॅनकार्ड बनावट असल्याचे आढळून आले.
रिजाउल मंडल (४३), मिना मंडल (४०) व तारेक मंडल (२५) अशी त्यांची नावे असून ते मूळचे बांग्लादेशचे राहणारे आहेत. रिजाउल व मिना हे पती पत्नी असून तारेक त्यांचा मुलगा आहे. मागील अनेक महिन्यांपासून हे कुटुंब भारतात बेकायदेशीर वास्तव्य करत होते. त्यांना बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड बनवून देणाऱ्या व्यक्तीने इतरही बांग्लादेशींना अशी बनावट कागदपत्रे बनवून दिल्याची शक्यता आहे. त्यानुसार याप्रकरणी अधिक चौकशी केली जात असून अटक केलेल्या तिघांवर नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.