ठाणे - बांगलादेशातील खुलणा राज्यातील कोलारुआ पोलीस ठाण्याचे हद्दीमधील इलिसपुर गावातील मशीदीत एक आणि मशिदीबाहेर दोन गावठी बॉम्बस्फोट करणाऱ्या घुसखोर बांगलादेशी मोफाज्जल हुसेन उर्फ मोफा अली गाझी उर्फ मफिजुल केराअली मंडल (42) याला ठाण्यातील सिडको बस स्टँड येथून ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने अटक केली.
मोफाज्जल याने 2002 साली बांगलादेशात स्फोट केला होता. त्यामध्ये तोहीन नावाचा इसम हा ठार झाला व काही इसम जखमी झाले होते. हे स्फोट करते वेळी एक गावठी बॉम्ब त्याचे हातात फुटल्याने त्याचा हात तुटला होता.याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन मोफाज्जलला अटक झाली होती. त्या गुन्ह्यांमध्ये त्याला बांगलादेश येथील न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.2004 साली वैद्यकीय कारणास्तव बांगलादेश उच्च न्यायालयाने जामीनावर मोफाज्जल याला मुक्त केले होते.तेव्हापासून तो बांगलादेशातून फरार झाला होता 2004 पासून पश्चिम बंगाल राज्यात मफीजुल या नावाने राहत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच अटक टाळण्यासाठी व शिक्षेपासून बचाव करण्यासाठी भारतामध्ये अनधिकृतपणे येऊन पश्चिम बंगाल राज्यात राहत होता तसेच तेथे बिगारी व मजुरीचे काम करून उदरनिर्वाह करीत होता. त्यातच तोे नवी मुंबई येथे सुद्धा ये- जात असे.
घुसखोर बांगलादेशी ठाण्यातील सिडको येथे येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने 19 मार्च रोजी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केल्यावर भारतीय नागरिक सिद्ध करणाऱ्या कागदपत्रांची अथवा बांगलादेशातून भारतात देण्यासाठी आवश्यक असलेले पारपत्र व व्हिसा नसल्याचे सांगून तो बांगलादेशी नागरिक असल्याचे सांगून 2002 साली बांगलादेश येथे झालेल्या बॉम्बस्फोटात शिक्षा लागली असल्याची कबुली ही त्याने दिली. तसेच याप्रकरणी ठाणे जिल्हा न्यायालयात हजर केले असता 27 मार्च 2020 पर्यंत त्याला पोलिस कोठडी मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली.