लातूर : शहरासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या पाेलीस ठाण्यांच्या हद्दित भरदिवसा घरफाेडी आणि माेटारसायकल पळविणाऱ्या तिघांच्या मुसक्या लातूर पाेलिसांनी आवळल्या आहेत. त्यांच्याकडून चार दुचाकींसह ५ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या तिघांविराेधात जिल्ह्यातील विविध पाेलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
पाेलिसांनी सांगितले, लातूर शहर आणि जिल्ह्यातील विविध पाेलीस ठाण्यांच्या हद्दित गत अनेक दिवसांपासून भरदिवसा, रात्रीच्या वेळी घरफाेडीच्या घटना माेठ्या प्रमाणावर घडत आहे. याशिवाय, दुचाकी चाेरीचे सत्र थांबता थांबत नाही. या घटनांनी नागरिक कमालीचे बेजार आहेत. घरफाेडीसह इतर गुन्ह्यातील आराेपींच्या मागावर पाेलीस पथक आहे. पथकाला खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे दिवसा घरफाेडीतील सुमीत दगडू गरगेवाड आणि राम दगडू गरगेवाड (रा. मळवटी राेड, नांदेड राेड लातूर) या अट्टल गुन्हेगारांच्या पाेलिसांनी माेठ्या शिताफीने मुसक्या आवळल्या. अधिक चाैकशी केली असता घरफाेड्या केल्याची कबुली या दाेघांनी दिली आहे. त्यांच्याकडून साेन्याचे दागिने, माेटारसायकल असा एकूण ४ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी एमआयडीसी पाेलीस ठाण्यात ३ तर चाकूर पाेलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल हाेताे. माेटारसायकलचाेरी प्रकरणी साहेबराव अकूंश जाधव (२४ रा. रमजानपूर ता. जि. लातूर ह.मु. लक्ष्मी काॅलनी, जुना औसा राेड, लातूर) याला पथकाने ताब्यात घेतले. अधिक चाैकशी केली असता, त्याने आपल्या साथीदाराच्या मदतीने माेटारसायकली चाेरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चार माेटारसायकली असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल पाेलीस पथकाने जप्त केल्या आहेत. त्याच्याविराेधात लातूर शहरातील शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात १ तर विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात दाेन गुन्हे दाखल आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकूण सात गुन्ह्यांचा छडा लावला आहे.