ठाणे - तीन कोटींचा इफेड्रिन हा अमली पदार्थ ठाणे ग्रामीण पोलिसांनी पकडला असून याप्रकरणी योगेश शहा (50) आणि सादेव जमादार (38) या दोघांना अटक केली आहे. जप्त केलेला अमली पदार्थ २५ किलो असून मुंबईहून भाईंदरला हा अमली पदार्थ अटक आरोपी घेऊन येत जाणार होते. ही करवाई आज पहाटे भाईंदर विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या पथकाने केली.
या दोन आरोपींना ठाणे ग्रामीण पोलिसांनी भाईंदर येथील बंटास हॉटेलजवळ इफेड्रीन या २५ किलो अमली पदार्थासह अटक केली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार बंटास हॉटेलसमोरही रोडवर काल रात्रीपासूनच पोलिसांनी सापळा रचला होता. त्यानंतर आज पहाटे ४.५५ वाजताच्या सुमारास रिक्षामधून २ इसमांना बॅगा घेऊन उतरताना पहिले आणि पोलिसांना त्यांना घेराव घालून त्यांना ताब्यात घेतले. दोघांची चौकशी केली असता त्यांची नावं योगेश शहा आणि सादेव जमादार असल्याची उघड झाली. हे दोघेही कांदिवली येथे राहणारे आहेत. त्याच्या अधिक चौकशीत आणि झडतीत इफेड्रीन हे अमली पदार्थ पोलिसांना सापडले. त्याची किंमत ३ कोटी असल्याचं उघड झालं आहे. या दोघांविरुद्ध नवघर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यात कलम ९ (अ), २५ (अ) आणि २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.