मुंबई : फॅशन डिझायनर आईच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या लक्ष सिंग (वय २२) याला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळालीअसून, त्याचा मालमत्तेवरून आईशी वाद होत होता, त्यातून त्याने हत्या केल्याचा संशय तपास अधिकाऱ्यांना आहे. गुुरुवारी त्याने आई सुनिता सिंग यांना ढकलून दिल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.आईला भूतबाधा झाल्याचा संशय लक्षला होता. वागण्यात, आवाजात अचानक होणाºया बदलामुळे त्याने आईला अनेकदा मारहाण केली होती. संपत्तीवरूनही त्यांच्यात वाद सुरू होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे सिंग यांच्या हत्येमागील मुख्य उद्देश वेगळाच असल्याचा संशय त्यांना आहे. शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल येणे बाकी आहे. त्यातूनच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. सिंग यांना मारण्यामध्ये लक्षसोबत ‘लिव्ह इन’मध्ये राहाणारी त्याची मैत्रीण आयेशा प्रिया हिच्यासह अन्य कोणी सहभागी आहेत का, याचीही चौकशी सुरू आहे. शुक्रवारी लक्षला अटक केल्यानंतर शनिवारी सकाळी न्यायालयात हजर केले असता, ८ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली.अंधेरीतील लोखंडवालात क्रॉस गेट इमारतीमध्ये तिघे एकत्र राहात होते. गुरुवारी त्यांच्यात वाद झाल्यानंतर लक्षने आईला ढकलून दिले. बेसिनला डोके आपटल्याने रक्तबंबाळ होऊन त्या बेशुद्ध पडल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षने पोलिसांना सांगितले.
फॅशन डिझायनर आईच्या हत्येप्रकरणी मुलाला तीन दिवसांची पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 01:46 IST