मुंबई/कल्याण : पंजाबमध्ये एका ग्रामपंचायत सदस्याची निर्घृण हत्या करून फरार झालेल्या आणि महाराष्ट्रात लपून बसलेल्या गँगस्टर सोनू खत्री गँगच्या तिघा गुंडांना कल्याणजवळ अटक केली. हे तिघेही आंतरराष्ट्रीय दहशतवादी हरविंदर सिंग रिंडा याच्या संपर्कात होते. त्याच्याच इशाऱ्यावरून ते महाराष्ट्रात दाखल झाल्याची माहिती मिळाल्याने पंजाब अँटी गँगस्टर टास्क फोर्स आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने मोहीम राबवीत तिघांनाही गजाआड केले.
शिवम अवतारसिंह माहोल, गुरमुख नरेश कुमार सिंह ऊर्फ गोरा आणि अमरदीप कुमार गुरमेलचंद अशी या गुन्हेगारांची नावे असून तिघेही कल्याणजवळ आंबिवली येथे लपले होते. तिघेही हत्या, हत्येचा प्रयत्न, शस्त्रास्त्रांची खरेदी-विक्री, तस्करी, स्फोटके तयार करणे यासारख्या गुन्ह्यांत सराईत आहेत. या पार्श्वभूमीवर बब्बर खालसा या दहशतवादी संघटनेशी संबंधित कारवायांप्रकरणीही तपास यंत्रणा या तिघांची चौकशी करत आहेत.
रिंडा हा गुन्हेगार आणि पाकिस्तानस्थित दहशतवादी गटांचा मुख्य दुवा होता. महाराष्ट्र, चंडीगड, हरियाणा आणि पश्चिम बंगालसह इतर ठिकाणांच्या गुन्ह्यांमध्ये तपास यंत्रणांकडून त्याचा शोध सुरू होता. रिंडा २००८ मध्ये गुन्हेगारी जगतात आला. चंडीगडमधील होशियारपूरचे सरपंच सतनाम सिंह यांच्या हत्येत त्याचा सहभाग होता. सुमारे ३० गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.
वीस गोळ्या घालून हत्या
२८ मार्च २०२२ रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास पंजाबच्या नवाशहर तालुक्यातील कंगा गावात पंचायत सदस्य मख्खन सिंह नजीकच्या पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी गेले होते. त्याचवेळी कारमधून आलेल्या चौघा हल्लेखोरांनी मख्खन सिंह यांच्यावर वीस गोळ्या झाडल्या. यात सिंह यांचा जागीच मृत्यू झाला. एवढे करूनही हल्लेखोर थांबले नाहीत. त्यांनी सिंह यांच्या तोंडातही गोळ्यांची अक्षरश: बरसात केली. त्यानंतर तिघेही फरार झाले होते.
हरविंदर सिंह रिंडाची हत्या झाल्याचा दावा?
हरविंदर सिंह रिंडा हा खलिस्तानी दहशतवादी असून त्याचा अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग होता. नोव्हेंबर २०२२ मध्ये त्याची पाकिस्तानात हत्या झाल्याची माहिती पंजाब पोलिसांमधील सूत्रांनी दिली होती. रिंडाची पाकिस्तानात गोळ्या घालून हत्या केल्याचा दावा दविंदर भांबिहा या गुन्हेगारी टोळीने सोशल मीडियावर केला होता. मे महिन्यात पंजाब पोलिस गुप्तचर मुख्यालयावर रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड हल्ला आणि लुधियाना न्यायालयात झालेल्या स्फोटात रिंडा मुख्य सूत्रधार होता, तसेच प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला प्रकरणातही रिंडा याचे नाव समोर आले होते.
५ महिन्यांपासून होते कल्याणमध्ये
मख्खन सिंह यांच्या हत्येनंतर तिघांनीही थेट मुंबई गाठली. पाच महिन्यांपासून ते आंबिवलीत भाड्याच्या घरात राहत होते. मजूर म्हणून राहण्याचे निर्देश त्यांना दिले होते, अशी माहिती पंजाब अँटी गँगस्टर टास्क फोर्सचे डीएसपी राजन परमिंदर यांनी दिली. दरम्यान, गँगस्टर सोनू खत्री हा रिंडा याचा साथीदार होता, तसेच पंजाबातून हत्या करून फरार झालेल्या आरोपींना मदत करण्याची तयारीही त्याने केली होती, अशी माहिती समोर आल्याचेही परमिंदर यांनी म्हटले आहे.
हत्येमागे पूर्ववैमनस्य
मख्खन सिंह यांच्या हत्येनंतर पोलिस चौकशीत सोनू खत्री गँगचे नाव समोर आले. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचे उघड झाले. हत्येनंतर तिघांंनी पंजाबातून पळ काढला. बराच काळ तिघेही पोलिसांच्या हाती लागत नव्हते. अखेर हे प्रकरण पंजाब अँटी गँगस्टर टास्क फोर्सकडे सोपविण्यात आले. त्यानुसार तिघांचा कसून शोध घेतला जात होता. तपासादरम्यान तिघेही बब्बर खालसा या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हरविंदर सिंह रिंदा याच्या संपर्कात असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर अत्याधुनिक शस्त्रास्त्रे असल्याची माहिती मिळाली.
सर्व बाबी पडताळून पंजाब अँटी गँगस्टर टास्क फोर्सचे एक पथक मुंबईला पोहोचले आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या मदतीने संयुक्त कारवाई करण्यात आली. कारवाईत तिघांना आंबिवलीच्या एनआरसी कॉलनीतील एका घरातून अटक करण्यात आली. सध्या तिघांनाही पंजाब अँटी गँगस्टर टास्क फोर्सच्या ताब्यात देण्यात आले आहे.