लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : यूट्यूबवर अपलोड केलेले न्यूड व्हिडीओ हटवण्याच्या बहाण्याने एका हॉटेल कर्मचाऱ्याकडून जवळपास ३ लाख रुपये उकळण्यात आले. मात्र पैशांची मागणी वाढत गेली आणि या व्यक्तीने अखेर अंधेरी पोलिस ठाण्यांत याप्रकरणी तक्रार दाखल केली.
तक्रारदार विजय (नावात बदल) हे अंधेरी पूर्वेतील कोंडी विटा गुंफा या ठिकाणी असलेल्या हॉटेलमध्ये कामाला आहेत. त्यांना २३ फेब्रुवारी रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास अनोळखी मोबाइल नंबरवरून व्हाट्स ॲप व्हिडीओ कॉल आला. जो त्यांनी घेतल्यावर समोर एक तरुणी विवस्त्र अवस्थेत त्यांना दिसली. त्यामुळे कॉल सुरू ठेवत आणि तिचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला मात्र, तो त्यांना पाहता आला नाही आणि अखेर त्यांनी तो कॉल कट केला. त्यानंतर समोरच्या क्रमांकावरून तीनवेळा व्हाट्सॲप व्हिडीओ कॉल आले. दुसऱ्या दिवशी दुपारी अडीचच्या सुमारास त्यांना एका मोबाइल क्रमांकावरून कॉल आला आणि कॉलरने विजयला त्यांचे न्यूड व्हिडीओ अनोळखी व्यक्तीने यूूट्यूबवर टाकले असून ते डिलिट करायचे असल्यास विशिष्ट क्रमांकावर कॉल करण्यास सांगितले.
असे उकळले पैसे दिलेला नंबर विजयने डायल केल्यावर त्यांना एका मोबाइल क्रमांकावर ३१ हजार ५०० रुपये पाठविण्यास सांगितले. जे पाठविल्यावर अजून ६२ हजार ५०० रुपये अन्य दोन व्हिडीओ डिलिट करण्यासाठी मागितले. विजयने त्याच्या मित्राकडून ते पैसे पाठवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे थोडे थोडे करत कॉलरने तक्रारदाराकडून ३ लाख ६ हजार रुपये उकळले तरी पैसे मागणे थांबत नव्हते. अखेर तक्रारदाराने याप्रकरणी अंधेरी पोलिसात धाव घेत अनोळखी व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली.